शाळेच्या कॉरिडोअरमध्येच तिसरीच्या विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने दुर्दैवी मृत्यू, शिक्षिकांचं दुर्लक्ष

तिसरीत शिकणाऱ्या आठ वर्षाच्या मुलीचा शाळेत पोहचताच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अहमदाबादमध्ये घडली. येथील जेबर स्कूलमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली आहे. गार्गी रानपरा असे मयत मुलीचे नाव आहे. वर्गात जात असतानाच गार्गी अचानक कोसळली. यानंतर तिला शाळेत सीपीआर दिल्यानंतर रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

गार्गीचे आई-वडील मुंबईत राहतात. गार्गी आजी-आजोबांसोबत अहमदाबादमध्ये राहत होती. कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे गार्गीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासातून कळते. गार्गीला अस्वस्थ वाटत होते तेव्हा तेथे तीन शिक्षिका गप्पा मारत उभ्या होत्या. वेळीच शिक्षिकांचं लक्ष तिच्याकडे गेलं असतं तर कदाचित गार्गीचा जीव वाचू शकला असता.

तिसरीत शिकणारी गार्गी शुक्रवारी नेहमीप्रमाणे शाळेत गेली. आपल्या वर्गाकडे जात असतानाच तिला अस्वस्थ वाटू लागल्याने ती थांबली. मग पुन्हा चालू लागली. पण अस्वस्थ वाटू लागल्याने पुन्हा थांबली आणि खुर्चीत बसली. यानंतर काही सेकंदातच ती खाली कोसळली. तिला सीपीआर देण्यात आला आणि तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.