सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी जालन्यामध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आक्रोश मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही सहभागी झाले होते. यावेळी मोर्चात संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना आवाहन केले आहे. आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
संतोष अण्णाचं काय चुकलं होतं? 20 वर्षे समाजकार्य केलं, कुटुंब उघड्यावर ठेवलं ते चुकलं होतं का? खूप चुकीच्या पद्धतीनं एका समाजसेवकाला एका कुटुंब प्रमुखालाच नव्हे तर एका गावच्या प्रमुखाला संपवलं. ही चुकीची घटना घडली. सगळ्यांना समजलंय कोण आरोपी आहेत. आजही सीआयडीच्या हाती एक व्हाईस सँपल मॅच झालं आहे. त्यामुळे हे कोण आरोपी आहेत, सगळ्यांना माहिती झालं आहे. जे राहिलेले आरोपी आहेत त्यांना अटक होऊन सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.
माझा जीव गेला तरी मी थोडंही मागे हटणार नाही. समाजाला एक आदर्श दाखवून दिल्याशिवाय मी थांबणार नाही. माझ्यासोबत तुम्ही राहा. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालताना माझ्या भावाला मोठं सुख भेटत होतं. त्याने आयुष्यात काहीच कमवलं नव्हतं. त्याच्याकडे एवढी संपत्ती होती जी की तुम्हा सगळ्यांना दिसतेय. त्याच्या मागे सगळा महाराष्ट्र उभा राहिला आहे, असे धनंजय देशमुख म्हणाले.
मानवाधिकार आयोगातही या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे. आयोगाचं पथक लवकरच बीडला येईल. मला जेवढं या प्रकरणात माहिती आहे, जे मुख्यमंत्र्यांना बोललो आहे ते आपण मांडून आपल्या भावाला न्याय घेतल्याशिवाय माघारी फिरायचं नाही. मुख्यमंत्रीसाहेब असं उदाहरण करून दाखवा की आपल्या शिव छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहु, फुले, आंबेडकरांच्या विचारांच्या महाराष्ट्रात ही गुन्हेगारी खपवून घेतली जात नाही आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर शिक्षा दिली जाते. आणि गुन्हेगारीला कसं मुळासकट संपवून टाकता येतं ही संधी आहे. ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, असे धनंजय देशमुख पुढे म्हणाले.