संतोष देशमुख हत्येच्या मुळाशी जायचं असेल तर पोलिसांनी न्यायालयाला विनंती करून त्याचा एक महिन्याची पोलीस कोठडी मागावी असे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले. तसेच दाऊद प्रमाणे वाल्मीक कराडची बीडमध्ये दहशत होती अशी टीकाही वडेट्टीवार यांनी केली.
आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत वडेट्टीवार म्हणाले की, वाल्मीक कराड हा दाऊद इब्राहीमच्या बरोबरीचा आहे. दाऊदची त्या काळी जशी दहशत होती, तशी वाल्मीक कराडची बीडवर दहशत आहे. त्यामुळे वाल्मीक कराडला खुनाच्या गुन्ह्याखाली अटक करून किमान पोलिसांना या सगळ्यांचे धागे दोरे शोधायचे असतील आणि तळापर्यंत जायचं असेल तर न्यायालयाला विनंती करून त्याचा एक महिन्याची पोलीस कोठडी मागावी असे वडेट्टीवार म्हणाले.
तसेच एका वर्षात एका जिल्ह्यात 110 खुन झाले हे फक्त बीडमध्येच होत आहे. त्यामुळे ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री कडक पावलं उचलताना आम्हाला दिसत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. पण हे बोलत असताना त्यांची मानसिकता बीडचा जो बिहार झाला आहे तो संपवण्याची मानसिकता दिसत नाही. तोपर्यंत वाल्मीक कराड नावाच्या माणसावर खुनाचा गुन्हा दाखल होत नाही. धनंजय मुंडेचा राजीनामा देत नाही तोपर्यंत या प्रकरणात न्याय मिळेल असे आम्हाला वाटत नाही असेही वडेट्टीवार म्हणाले.