बीडमधील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी आज जालनामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात संतोष देशमुख यांचे कुटुंबीयही सहभागी झाले आहेत. त्यासोबत मराठा आरणक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटीलही मोर्चात आहेत. जरांगे पाटील यांनी मोर्चात सहभागी होत जातीवाद करणाऱ्यांना फटकारले आहे.
संतोष देशमुख यांच्या लेकीला न्याय मिळणं गरजेचं आहे. लेक आक्रोश करतेय. म्हणून लेकीला न्याय मिळणं गरजेचं आहे. म्हणून मोर्चे होणं गरजेचं आहे. मोर्चा म्हणजे जातीवाद असू शकत नाही. हा भ्रम असणाऱ्यांनी आधी आपला भ्रम दूर करावा. संतोष देशमुखांच्या भावाला धनंजय देशमुखांना गुंड धमक्या देणार असतील, त्यांना अरेरावी करणार असतील तर त्या विरोधात बोलणं गरजेचं आहे, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
जर धनंजय देशमुखला धमकी येत असेल तर या राज्यातला एकही माणूस असा नाही जो धनंजय देशमुखांच्या बाजूने उभा राहणार नाही. धनंजय देशमुखांना धमकी देणाऱ्या गुंडाला बोललं तर त्याला तुम्ही जातीवाद म्हणताय का? मग धनंजय देशमुखला मारून टाकायचं का, संतोष देशमुख यांच्या सारखं? त्यामुळे न्यायासाठी मोर्चे होणार आहेत, असे मनोज जरांगे यांनी ठणकावले.