संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींना सोडून देणार? अंबादास दानवे यांनी व्यक्त केला संशय

संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपी सोडणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतता, पण त्यांना अजून पकडलेच नाही असा टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी लगावला. तसेच या प्रकरणातला आक्रोश कमी झाला तर या आरोपींना सरकार सोडून देणार का असा संशयही त्यांनी व्यक्त केला.

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत अंबादास दानवे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की आरोपींना सोडणार नाही. अजून पकडलेच नाही तर सोडायचा प्रश्नच येत नाही. काल सुरेश धस यांनी वाल्मीक कराडची संपत्ती जाहीर केली. एकीकडे ईडीने संजय राऊत आणि अनिल देशमुख यांच्यावर धाडी टाकत कारवाई केली. आणि दुसरीकडे वाल्मीक कराडकडे एवढी संपत्ती असताना ईडीचे याकडे लक्ष नाही.

तसेच संतोष देशमुख हत्येप्रकरणी एक आरोपी सापडत नाहिये. मुख्य आरोपीवर 302 चा गुन्हा दाखल होत नाहिये. संबंधित मंत्र्यांवर सरकारने कारावाई केलेली नाही. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे झालेले आहे का? संतोष देशमुख हत्या प्रकरणी ढळढळीत पुरावे असून, समाजात एवढा आक्रोश असताना सरकार गुन्हेगारांचा पाठीशी घालत आहे का? एकीकडे सरकार म्हणतंय की आम्ही आरोपींना पकडलं. पण आरोपींना पकडलं नसून ते आरोपी हजर झाले आहेत. सरकारच्या भुमिकेविषयी साशंकता निर्माण झाली आहे. जनतेचा आक्रोश कमी झाला तर आरोपींना सोडून देतील अशी भुमिका सरकारची आहे का? अशी शंका लोकांच्या मनात आहे असेही दानवे म्हणाले.