सिक्कीममध्ये बंधारा फुटून दुर्घटना, अलिबागचा जवान सुयोग कांबळे शहीद

अलिबागच्या नारंगी गावातील जवान सुयोग कांबळे यांना अखेर लष्कराने ‘शहीद’ घोषित केले आहे. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सिक्कीम येथे कर्तव्य बजावत असताना अचानक धरणाचा बांध फुटून लष्कराची संपूर्ण तुकडीच पाण्यात वाहून गेली. या दुर्घटनेनंतर सुयोग कांबळे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा ठावठिकाणा लागला नाही. सवा वर्षानंतर त्यांना शहिदाचा दर्जा देण्यात आला आहे. येत्या रविवारी 20 जानेवारी रोजी त्यांना लष्करी इतमामात मानवंदना दिली जाणार आहे.

सुयोग कांबळे यांनी 18 वर्षे लष्करात विविध पदांवर काम केले. महार रेजिमेंटमध्ये ते होते. काही वर्षे ते सिक्कीममध्ये होते. 4 ऑक्टोबर 2023 रोजी धरणाचा बंधारा फुटला आणि एकच हाहाकार झाला. बचावकार्यासाठी गेलेल्या लष्कराच्या तुकडीत सुयोग कांबळे यांचा समावेश होता. कर्तव्य बजावत असताना प्रचंड पाण्याचा लोट आला आणि संपूर्ण तुकडीच वाहून गेली.

लष्कराच्या वतीने कांबळे कुटुंबाला पत्र पाठवून सुयोग यांना शहिदाचा दर्जा दिला असल्याचे कळवले. सुयोग कांबळे यांना नारंगी गावी रविवारी मानवंदना दिली जाणार आहे.