सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसनं पुढाकार घ्यावा, कारण इंडिया आघाडी तुटली तर पुन्हा बनणार नाही! – संजय राऊत

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया आघाडीची आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची बैठक झालेली नाही हे खरे आहे. तीन पक्षात समन्वय राहिला नाही तर भविष्यामध्ये त्याची किंमत सगळ्यांनाच मोजावी लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. कारण राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी तुटली तर पुन्हा बनवणार नाही, असे स्पष्ट मत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी माध्यमांनी बोलताना व्यक्त केले.

हे खरे आहे की लोकसभा निवडणुकीसाठीच इंडिया आघाडीची स्थापना झाली. विधानसभेला त्याचा फारसा प्रभाव पडला नाही. प्रत्येक जण आपापले घोटे दामटत राहिला. त्यामुळे इंडिया आघाडी, महाविकास आघाडी किंवा इतर राज्यातील आघाड्या असतील त्या संदर्भात लोकांनी वेगळ्या भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. पण याला जबाबदार कोण? काँग्रेस देशातील मोठा पक्ष असून त्यांचे शंभरावर खासदार आहेत. सगळ्यांना एकत्र ठेवण्यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला पाहिजे. आम्ही सगळे प्रादेशिक पक्ष असून आमच्या आघाडीमध्ये काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत काँग्रेसचे विरोधी पक्षनेते आहेत. सगळ्यांना एकत्र ठेवण्याची आणि आघाडी टिकवण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे, असेही राऊत यावेळी म्हणाले.

इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडी विसर्जित होणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, विसर्जित हा फार टोकाचा विषय आहे. यात दुरुस्ती करता येईल का या संदर्भात विचार केला पाहिजे. झालेल्या चुका आणि त्या संदर्भातील काय सुधारणा करू शकतो हे महत्त्वाचे आहे. इंडिया आघाडीचे अस्तित्व राहिले नाही अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली तर त्यास काँग्रेस जबाबदार असेल.

पवन खेरा यांनी इंडिया आघाडी लोकसभेपुरती होती असे विधान केले. याचाही समाचार घेत राऊत म्हणाले की, इंडिया आघाडीचे अस्तित्व राहिले नाही हे काँग्रेसने जाहीर करावे. इंडिया आघाडी फक्त लोकसभेपुरती होती, आता त्याचे अस्तित्व राहिले नाही असे काँग्रेसने अधिकृतपणे जाहीर करावे. काँग्रेसची ही भूमिका असेल तर आम्ही आमचे मार्ग निवडायला मोकळे. कारण राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडी तुटल्यावर पुन्हा बनणार नाही.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ‘बचेंगे तो लढेंगे’ ही भूमिका कायम शिवसेनेने घेतलेली आहे. आमचा पक्ष लढणाऱ्यांचा आहे. आम्ही कधी झुकलो नाही, वाकलो नाही, तुटलो नाही आणि विकलोही गेलो नाही. आमच्या पक्षामधील कुणी सांगत नाही की दुसऱ्या गटात जाऊन सत्तेत सामील होऊया. आमचे 20 आमदार असून त्याच्यातील एकाचेही म्हणणे नाही की फुटलेल्या गटात सामील व्हायचे आणि सत्तेची ऊब घ्यायची. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढत राहू.