पुणे पोलिसांच्या दामिनी पथकाच्या टीमवर्कमुळे आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका महिलेचा जीव वाचला आहे. नवऱ्यासोबत किरकोळ भांडणाच्या रागातून महिलेने जीव देण्याची तयारी केली होती. मात्र, या प्रकरणाची माहिती मिळताच, शिवाजीनगर दामिनी पथकासह मार्केटयार्ड, पर्वती दामिनी पथकांनी तातडीने तपासाला गती दिली. लोकेशननुसार रेल्वे स्टेशन, नदीपूल, उड्डाणपूल पूल परिसरात शोधमोहीम राबविली. अखेर पर्वती परिसरात महिलेचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले असून, तिचे समुपदेशन करण्यात आले आहे.
भांडण झाल्याच्या रागातून पत्नी आत्महत्या करणार असल्याचा कॉल तक्रारदाराने 8 जानेवारीला नऊच्या सुमारास शिवाजीनगर पोलीस दामिनी सोनाली हिंगे यांना केला. त्यानुसार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने तपासाला गती दिली. संबंधित महिलेचे लोकेशन रेल्वे स्टेशन, बंडगार्डन परिसर, ससून हॉस्पिटल परिसरात आढळून आले. त्यानुसार हिंगे, भोसले, हवालदार वलटे, चव्हाण, मोहिते, दडस, तायडे यांनी शोधमोहीम राबविली. मात्र, महिला आढळून आली नाही. महिला सातत्याने ठिकाण बदलत असल्यामुळे शोधमोहिमेत अडचण निर्माण झाली होती. अखेर महिलेचे लोकेशन पर्वती परिसरात असल्याचे दिसून आले. त्यानुसार भरोसा सेलच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता जाधव, उपनिरीक्षक प्रियंका बागुल यांनीही शोधमोहिमेत सहभाग घेत तिचा शोध घेतला.
टीमवर्क ठरले फायदेशीर
आत्महत्येच्या प्रयत्नात असलेली महिला पर्वती पायथा परिसरात मिळून आली. तिला पर्वती दामिनी मार्शल सपकाळ, भरगुडे, ठाकरे यांच्यासह चव्हाण, घायतडक, घाडगे यांनी धीर दिला. संबंधित महिलेला शिवाजीनगर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्याठिकाणी महिलेसह तिच्या नक्ऱ्याचे पोलिसांनी समुपदेशन केले. त्यानंतर तिला तिचे मामा-मामी, पतीसह इतर नातेवाईकांकडे सुखरूप स्वाधीन केले. ही कामगिरी उपायुक्त संदीपसिंह गिल्ल, उपायुक्त निखिल पिंगळे, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, भरोसा सेल पोलीस निरीक्षक संगीता जाधव, उपनिरीक्षक प्रियंका बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
आत्महत्येच्या प्रयत्नात तिच्या पतीला सातत्याने बोलण्यास प्रवृत्त केले. त्यांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. त्यासोबत दामिनी पथकांच्या समन्वयातून मिळालेल्या वेळेत मनुष्यबळ उपलब्ध करून महिलेचा शोध घेऊन तिचा जीव वाचविला आहे.
चंद्रशेखर सावंत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिवाजीनगर पोलीस ठाणे