मंत्रालयात आलेली लँबोर्गिनी कार राज्य सरकारच्या बिल्डर मित्राची

मंत्रालयात थेट प्रवेश मिळालेल्या अलिशान लँबोर्गिनी कारची आणि कारच्या मालकाची प्रशासनाने चौकशी सुरू केली असून प्राथमिक माहितीनुसार ‘स्कायलाईन कमर्शिअल रिअलर्टर’च्या नावावर ही अलिशान गाडी आहे. त्यामुळे मंत्रालयातील बिल्डर लॉबीची उठबस आणि सरकारमधील उद्योगपतींचे मित्रांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

मंत्रालयात बुधवारी आलेल्या लँबोर्गिनी कारमुळे प्रशासनामध्येही खळबळ माजली आहे. मंत्रालयातील पोलीस विभागही हादरला आहे. नक्की कोणत्या मंत्र्याच्या सांगण्यावरून कोटय़वधी रुपयांच्या या कारला थेट प्रवेश मिळाला याचीही चौकशी सुरू झाली आहे. पोलिसांनी मोटारीच्या व्हीव्हीआयपी क्रमांकावरून तपास सुरू केला. तेव्हा स्कायलाईन ‘कमर्शिअल रिअलर्टर एलएलपी’ या कंपनीच्या नावावर या गाडीची नोंद असल्याचे आरटीओच्या रजिस्ट्ररमध्ये आढळून आले. या कंपनीचे कार्यालय खारच्या पश्चिमेला आहे.

लँबोर्गिनीची खरेदी 23 जुलै 2022 रोजी करण्यात आल्याची नोंद आरटीओमध्ये आहे. कंपनीच्या नावावर ही गाडी असल्याने मालकाचे नाव यामध्ये नमूद नाही. मात्र आरटीओच्या नोंदीवर [email protected] हा ई-मेल क्रमांक नमूद केला आहे.