मेटान्यूमो व्हायरसचे देशभरात 12 रुग्ण, उत्तर प्रदेशातील 60 वर्षीय महिलेला विषाणूची लागण

चीनमध्ये जन्माला आलेल्या मेटान्यूमो व्हायरसने हिंदुस्थानात शिरकाव केला आहे. कोरोनासारखाच घातक असलेल्या या विषाणूचे देशभरात 12 रुग्ण आढळले आहेत. उत्तर प्रदेशातील लखनौ येथील 60 वर्षीय महिलेला विषाणूची लागण झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच गुजरातमधील एका 80 वर्षांच्या वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये प्रत्येकी 3, कर्नाटक आणि तामीळनाडूमध्ये प्रत्येकी 2 तसेच उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. चीनमध्ये थैमान घातलेल्या विषाणूने पाय पसरताच विविध राज्यांनी दक्षता वाढवली आहे.

पंजाबमध्ये वृद्ध आणि लहान मुलांना मास्क घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हरयाणात आरोग्य विभागाला नवीन व्हायरसच्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, तर गुजरातमधील इस्पितळांमध्ये आयसोलेशन वॉर्ड बनवले जात आहेत. परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी छत्तीसगड सरकारने तांत्रिक समिती स्थापन केली आहे. जम्मू-कश्मीरच्या आरोग्य विभागाने घाबरू नका, काळजी घ्या, असा सल्ला दिला. हिंदुस्थानात आतापर्यंत सापडलेल्या मेटान्यूमोच्या प्रकरणांमध्ये सर्वाधिक लहानग्यांचा समावेश आहे.