अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसच्या जंगल परिसरात लागलेल्या भीषण वणव्यात हॉलीवूड कलाकारांची घरे जळून खाक झाली. सुमारे 16,000 एकर परिसरात ही आग पसरली आहे. हजारो लोक मिळेल त्या मार्गाने बाहेर पडत आहेत. या दुर्घटनेत किमान पाच जणांचा मृत्यू झाल्या असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ब्रेटनवुड भागातील कमला हॅरिस यांचे घर रिकामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर जो बायडेन यांचा इटलीचा नियोजित दौरा रद्द करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांचा हा शेवटचा परदेशी दौरा होता. मंगळवारी लागलेल्या आगीमुळे आतापर्यंत 4 हजार 856 हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, 11 हजार इमारती जळाल्यामुळे 28,000 घरांचे नुकसान झाले आहे.
भयंकर वणव्याने संपूर्ण शहराला लालबुंद केले असून शहर आगीच्या कचाटय़ात सापडल्यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. आगीमुळे परिसरातील सुमारे 50,000 लोकांना स्थलांतरित होण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आगीत घरांची राख झालेल्या लोकांमध्ये ख्यातनाम व्यक्तींचा समावेश आहे. त्याचबरोबर तीन लाख लोकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अंगावर काटा आणणारी आग ताशी 160 किमी वेगाने वाहणाऱ्या ‘सांता सना’ वाऱ्यामुळे नियंत्रणाबाहेर गेली.
मंगळवारी आग भडकली आणि रात्री लॉस एंजेलिसच्या डाऊनटाऊनजवळ उत्तरेला असलेल्या राष्ट्रीय जंगलातील एका खोऱयाजवळ पोहोचली. बुधवारी दुपारपर्यंत 15 हजारपेक्षा जास्त एकर क्षेत्रात आगीने पाय पसरले होते. आगीचे लोट वाऱयाच्या वेगाप्रमाणे पुढे सरसावत होते. कोरडे इंधन आणि ताशी 99 मैल वेगाने वाहणाऱया वाऱयामुळे आगीला वेग प्राप्त झाला. हवामान बदलामुळेही आगीचे असे विनाशकारी स्वरूप आहे, असे हवामान तज्ञांनी सांगितले. दरम्यान, दक्षिण पॅलिपहर्नियात 1 ऑक्टोबरपासून सरासरी एक टक्क्यापेक्षा कमी पाऊस झाला आहे.
आग कधी संपणार?
संपूर्ण कॅलिफोर्नियात हाहाकार माजवणारी आग उष्ण तापमान आणि वाढलेला दुष्काळ यामुळे नेहमीच्या हंगामापेक्षा जास्त काळ राहील, असे वॉशिंग्टन विद्यापीठातील वेस्टर्न फायर आणि फॉरेस्ट रेझिलिन्स कोलॅबोरेटिव्हचे डेप्युटी डायरेक्टर क्रिस्टल रेमंड यांनी नमूद केले. नैसर्गिक वनस्पती असलेले क्षेत्र व्यावसायिकदृष्टय़ा विकसित होत नाही तोपर्यंत आगीमुळे विनाश होतच राहील, असेही तज्ञांनी स्पष्ट केले.
ऑस्करच्या नामांकनाला विलंब
सुकलेल्या झाडांना आग लागली अन् शहरात पसरली. अंगावर काटा आणणारी आग नियंत्रणाबाहेर गेल्याने हॉलीवूड हिल्सलाही आग लागली. तसेच या आगीच्या घटनेमुळे ऑस्करच्या नामांकनाला विलंब झाला आहे. 97 व्या अकादमी पुरस्कारांची नामांकन घोषणा 17 जानेवारीला होणार होती. मात्र दक्षिण पॅलिपहर्निया प्रदेशात लागलेल्या वणव्याच्या पार्श्वभूमीवर ही तारीख 19 जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.