बॉर्डर-गावसकर करंडकात (बॉगाक) हिंदुस्थानला 3-1 फरकाने पराभूत करणारा ऑस्ट्रेलियन संघ आता श्रीलंका दाऱयावर जाणार आहे. या दोन कसोटी सामन्यांच्या दौऱयासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (सीए) स्टीव्ह स्मिथच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपावली आहे, ट्रव्हिस हेडला उपकर्णधारपद करण्यात आले आहे. नियमित कर्णधार पॅट कमिन्सने वैयक्तिक कारणामुळे श्रीलंका दौऱ्यातून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका 29 जानेवारीपासून सुरू होईल. हिंदुस्थानविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया नॅथन मॅकस्विनीला आणखी एक संधी दिली गेली आहे. हिंदुस्थानविरुद्ध पदार्पणाच्या कसोटीत 60 धावांची खेळी करणारा सॅम कॉन्सटसलाही श्रीलंकेविरुद्धच्या संघात स्थान देण्यात आले आहे.
सिडनी कसोटीत 10 विकेट आणि पाच सामन्यांपैकी तीन सामने खेळून 21 विकेट काढणाऱया स्कॉट बोलॅण्डलादेखील संघात स्थान देण्यात आलं आहे. मिशेल मार्श, शॉन अॅबट आणि बोलॅण्ड गोलंदाजीची धुरा सांभाळतील. हिंदुस्थानविरुद्ध शेवटच्या कसोटीत पदार्पण करणाऱया ब्यू वेबस्टरलादेखील श्रीलंका दौर्यात स्थान मिळाले आहे.
दोन सामन्यांची कसोटी मालिका श्रीलंकेत होणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने संघात फिरकी गोलंदाजांनादेखील स्थान दिले आहे. यामध्ये नॅथन लायन, टॉड मर्फी आणि मॅथ्यू कुहनेमन यांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील दोन्ही कसोटी सामने गॉल स्टेडियममध्ये होतील. ऑस्ट्रेलिया यापूर्वी श्रीलंका दौऱयावर आला होता. त्यावेळी त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता, तेव्हा श्रीलंकेनं 3-0 अशी मालिका जिंकली होती.
ऑस्ट्रेलियाचा संघ – स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), ट्रव्हिस हेड (उपकर्णधार), मिशेल स्टार्क, स्कॉट बोलॅण्ड, अॅलेक्स कॅरी, कूपर कोनोली, जोश इंगलिस, उस्मान ख्वाजा, सॅम कॉन्सटस, मॅट कुहेनमन, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, नॅथन मॅकस्विनी, टॉड मर्फी, ब्यू वेबस्टर.