हिंदुस्थानचा झुंजार बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉयने मलेशिया सुपर 1000 बॅडमिंटन स्पर्धेची दमदार सुरुवात करताना पहिला सामना जिंकला होता. मात्र, त्यानंतर दुसऱया फेरीतच तो गारद झाला. प्रणॉयला चीनच्या लि शी फेंगने हरविले. एच. एस. प्रणॉयने सलामीच्या लढतीत कॅनडाच्या ब्रायन यांगचा 21-12, 17-21, 21-15 असा पराभव केला होता. मात्र, गुरुवारी दुसऱया फेरीत या 32 वर्षीय हिंदुस्थानी खेळाडूला सातव्या मानांकित लि शी फेंगने 21-8, 15-21, 23-21 असे हरविले. ही चुरशीची लढत एक तास 22 मिनिटांपर्यंत रंगली.
हिंदुस्थानची दुहेरीत निराशा
महिला दुहेरीत त्रिशा जॉली व गायत्री गोपीचंद या हिंदुस्थानी जोडीला उप उपांत्यपूर्व लढतीत जिया यी फान व झांग शु जियान या चीनी जोडीने 15-21, 21-19, 21-19 असे पराभूत केले. मिश्र दुहेरीतही ध्रुव कपिला व तनीषा क्रास्टो या हिंदुस्थानी जोडीला चीनच्या चेंग जिंग व झांग ची या सातव्या मानांकित जोडीने 21-13, 22-20 असे हरविले. ही लढत जेमतेम 44 मिनिटांपर्यंत चालली.