ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नागलची सलामी माचाकशी

हिंदुस्थानचा अव्वल टेनिसपटू सुमित नागल रविवार, 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ऑस्ट्रेलियन ओपन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कौशल्य पणाला लावणार आहे. त्याची सलामीची लढत झेक प्रजासत्ताकच्या थॉमस माचाक याच्याशी होईल. 27 वर्षीय सुमित नागल एटीपी क्रमवारीत 96 व्या स्थानावर आहे. जागतिक क्रमवारीत अव्वल 104 मध्ये असल्यामुळे त्याला वर्षातील या पहिल्या ग्रॅण्डस्लॅमच्या मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळाले. हरयाणाच्या सुमित नागलने गतवर्षी ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये पहिल्या फेरीत 27व्या मानांकित कझाकिस्तानच्या अलेक्झांडर बुबलिकचा पराभव केला होता. मात्र दुसऱ्या फेरीत त्याला चीनच्या जुनचेंग शांगकडून पराभव पत्करावा लागला होता. यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये सुमित विजयी सलामी देणार काय याकडे तमाम देशवासीयांच्या नजरा असतील.