शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंबईतील विविध समस्या आणि वरळी मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात आदित्य ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. निवृत्त पोलीस बांधवांना मुंबईतच घरे मिळावीत आणि महाविकास आघाडीचे सरकार असताना आणलेल्या मुंबईत सर्वांसाठी पाणी या धोरणावरील स्थगिती उठवावी, अशा प्रमुख मागण्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या. त्यावर सकारात्मक चर्चा झाली.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून आदित्य ठाकरे यांची ही तिसरी भेट आहे. या भेटीनंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधून भेटीतील चर्चेबाबत माहिती दिली. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेना उपनेते-आमदार सचिन अहिर, सुनील शिंदे तसेच वरळी विधानसभेतील शिवसेनेचे पदाधिकारीही उपस्थित होते.
वरळीतील पोलीस वसाहतींमध्ये राहणाऱया निवृत्त पोलिसांकडून प्रति चौरस फुटामागे 150 रुपये दंड स्वरूपात घेतले जात आहेत. तो कमी करून 20 रुपये प्रति चौरस फूट इतका घेण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री फडणवीस यांना केली असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. पोलिसांच्या अनेक पिढय़ांनी मुंबईची सेवा केली असून निवृत्त पोलिसांना मुंबईतच घरे कशी देता येतील याबाबतही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. निवृत्त पोलिसांना मुंबईत घरे दिली जातील असे आश्वासन मागील सरकारने दिले होते, परंतु अद्याप त्यांना घरे देण्यात आली नसून ती मुंबईत मिळावीत अशी आग्रही मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. वरळी, कुर्ला, मरोळ, सांताक्रुझमध्ये असलेल्या पोलीस वसाहतींमधील इमारतींची पुनर्बांधणी करावी आणि त्यासाठी निधी द्यावा, असेही मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
- महाविकास आघाडी सरकार असताना मुंबईत सर्वांसाठी पाणी ही योजना आम्ही आणली होती, मात्र मिंधे सरकारच्या काळात त्याला स्थगिती दिली गेली. कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीचे लीगल स्टेटस न पाहता त्यांना पाणी मिळणे हा त्यांचा हक्क आहे, त्यामुळे या योजनेवरील स्थगिती तातडीने हटवण्यात यावी.
- कलेक्टरच्या जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी प्रीमियम कमी करण्याच्या धोरणाची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.
गिरणी कामगारांना लवकर घरे द्या
गिरणी कामगारांना लवकरात लवकर घरे मिळावीत यासाठी ठोस भूमिका घेण्यात यावी असे आपण मुख्यमंत्र्यांना सांगितले असून त्यावर दावोस दौऱयावरून परतल्यानंतर बैठक घेऊन चर्चा करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. मागच्या सरकारमधील मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी दावोसला जाऊन उधळपट्टी केली होती. तशी फडणवीस यांच्या दौऱयात होऊ नये अशी अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
टोरेस घोटाळय़ाप्रकरणी कारवाई करा
मुंबई, ठाणे, कल्याण अशा वेगवेगळय़ा भागांमध्ये शाखा उघडून ग्राहकांना सोने, चांदी आणि हिऱयाचे दागिने देणाऱया ‘टोरेस’ कंपनीने हळूहळू पैशांत गुंतवणूक स्वीकारायला सुरुवात केली आणि संधी मिळताच हजारो कोटी घेऊन पोबारा केला. अनेक मध्यमवर्गीयांचेही पैसे त्या पंपनीत अडकले आहेत. त्यामुळे टोरेस घोटाळ्याप्रकरणी कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केल्याचे सांगितले.
…आम्हीही फडणवीसांचे कौतुक करू
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केल्याबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी यावेळी आदित्य ठाकरे यांना सांगितले. त्यावर, आम्ही मांडलेल्या मागण्याही फडणवीसांनी पूर्ण केल्या तर आम्हीही त्यांचे काwतुक करू, असे आदित्य ठाकरे म्हणाले.