मुद्दा – आर्थिक फसवणूक : धडा कधी घेणार?

>> बबन लिहिणार

संचयनी चिटफंड घोटाळा 1980 मध्ये उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. पश्चिम बंगालसह देशातील 1.31 लाखांहून अधिक लोकांचे कष्टाचे पैसे एका क्षणात बुडाले होते. कुणाच्या मुलीच्या लग्नासाठी जमवलेली जमापुंजी यात गेली होती, तर कुणाच्या स्वप्नांच्या घरासाठी साठवलेला पैसा यात बुडाला होता. परंतु लोकांनी यातून काही धडा घेतला असं दिसत नाही. 80 आणि 90 च्या दशकांनंतर 2000 ते 2024 पर्यंतच्या काळात देशात टप्प्याटप्याने लोकांची चिटफंड घोटाळ्यासारखी आर्थिक फसवणूक झालीय. या घोटाळ्याचा फरक फक्त इतका होता की, या योजनेची नावे वेगळी होती. आमिष दाखवणे वेगळे होते. फसवणूक झालेले लोक वेगळे होते. हजारो लोकांना चुना लावून त्यांच्या कष्टाचा पैसा घेऊन पसार व्हायचे हा उद्देश मात्र एकसारखा होता. देशभरात वेगवेगळ्या नावाने अशा किती तरी स्कीम आल्या अन् कोटय़वधी रुपयांचा घोटाळा करून गेल्या. त्यात लोकांनी मेंढराप्रमाणे पैसे गुंतवले आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली. आता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत सोने, चांदी, हिरे यांची विक्री करणाऱया ‘टोरेस’ नावाच्या पंपनीने अवघ्या वर्षभरात मुंबईकरांची दिवसाढवळ्या आणि दादरसारख्या गजबजलेल्या ठिकाणी तब्बल 3 हजार कोटी रुपयांची फसवणूक केली. यात कोणाकोणाचे किती पैसे बुडाले याची खरी आकडेवारी समोर येईल तेव्हा येईल, परंतु लोकांच्या होणाऱया फसवणुकीचे हे जे चक्र सुरू झाले आहे. ते नक्की कधी थांबणार आहे, हा खरा प्रश्न आहे.

लोकांना झटपट श्रीमंत व्हायचे आहे, परंतु कोणत्याही स्कीमद्वारे दुप्पट, तिप्पट परतावा देऊ असे जे आश्वासन दिले जाते, ते फक्त आश्वासन असते. ते प्रत्यक्षात देणे शक्य नसते हे ज्या दिवशी लोकांना समजेल तो दिवस कधी उजाडेल? ‘टोरेस’ पंपनीने लाखो लोकांना फसवले. नाही म्हणजे ती फसवणूक होणारच होती. कारण दर आठवडय़ाला 4 टक्क्यांपासून 11 टक्क्यांपर्यंत परतावा देणे, म्हणजेच महिन्याला 44 टक्के परतावा मिळणे कसे शक्य आहे. ‘लालच बुरी बला’ आहे इतपं ध्यानात आलं तरी अशा घटनांना आळा बसू शकेल. टोरेसच्या घोटाळ्याआधी मुंबईत अनेक छोटय़ा-मोठय़ा आर्थिक फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. काही घोटाळय़ांची चर्चा झाली, तर काहींची चर्चा झाली नाही. लोक पैसे गुंतवतात, परंतु पैसे बुडाल्यानंतर समाजात आपले हसे होऊ नये यासाठी गप्प बसणे पसंत करतात. चार ते पाच महिन्यांपूर्वी मुंबईतील चेंबूरच्या एका झोपडपट्टी पुनर्वसन झालेल्या इमारतीत दुप्पट पैशांचे आमिष दाखवून कोटय़वधींना लुटण्यात आले. छत्रपती संभाजीनगरमधील या व्यक्तीने थेट 10 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. काही लोकांनी घरे गहाण टाकून पैसे दिले, काहींनी सोन्याचे दागिने मोडून पैसे भरले, परंतु टोरेसप्रमाणे सुरुवातीला लोकांना चांगला परतावा मिळत गेला. अनेक लोक जोडले गेल्यानंतर आणि एक ठरावीक रक्कम जमा झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने हात वर केले.

त्याआधीही शेअर मार्केटच्या नावाखाली कोल्हापूरमधील एका व्यक्तीने थेट मुंबई गाठून अनेकांची आर्थिक फसवणूक केली. यामध्ये तर काही पत्रकारही होते. सांगायचा मुद्दा हाच आहे की, आता टोरेसने घोटाळा केलाय. उद्या आणि भविष्यात असाच घोटाळा होईल. लोकांचे कोटय़वधी रुपये बुडतील. बातम्या होतील. आर्थिक फसवणूक करण्यासाठी फक्त स्कीमचे नाव वेगळे असेल. परतावा वेगळा असेल, स्वप्नं वेगळी दाखवली जातील अन् लोकांच्या कष्टाची कमाई घेऊन जातील. मग यात सेलिब्रिटी असतील, राजकारणी असतील, व्यावसायिक असतील, मध्यमवर्गीय असतील, गरीब व्यक्ती असेल. कारण लोकांना झटपट पैसा कमवायचा आहे. ज्याला घर नाही त्याला घर घ्यायचं आहे. ज्याला घर आहे त्याला मोठं घर घ्यायचं आहे. दुचाकी, चारचाकी वाहनं खरेदी करायची आहेत. ऐशोआरामात राहायचं आहे. तेही झटपट. लोक टोरेसच्या प्रकरणातून धडा घेणार नाहीत. कारण आम्ही सुधारणार नाही, हेच सत्य आहे.