>> डॉ. प्रीतम भि. गेडाम, [email protected]
ग्राहक संरक्षण कायद्यानुसार, प्रत्येक भारतीय ग्राहकाला संरक्षण, माहिती, निवड, म्हणण्याचा, तक्रार व निवारण आणि ग्राहक हक्क शिक्षण असे सहा अधिकार मिळाले आहेत. पण पैसे खर्च करण्याच्या तुलनेत ग्राहकाला योग्य उत्पादन मिळत आहे का? मुळात ग्राहकाची जागरुकता आणि तत्परताच फसवणुकीला आळा घालू शकते. कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक हक्कांची जाणीव ठेवायला हवी. उत्पादन खरेदी करताना, सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर नुकसान होत नाही.
ग्राहकांची फसवणूक ही अशी समस्या आहे, ज्याला आपण दररोज कळत-नकळत बळी पडतो, पण अनेक वेळा माहीत असूनही आपण त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा फारसे गांभीर्य दाखवत नाही, उलट त्याचा खूप परिणाम होऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेला हानी पोहोचते. वाहनांचे इंधन जे सामान्य माणूस दररोज वापरतो. पुष्कळशा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरल्यानंतर गाडीच्या टायरमध्ये हवा भरताना तेथील कर्मचारी हवा तपासण्यासाठी पैसे घेतात, जेव्हा की पेट्रोलच्या दरात काही सेवा मोफत दिल्या जातात. जसे शौचालयाचा वापर, पिण्याचे पाणी, तक्रार पुस्तिका, वाहनाच्या टायरमध्ये हवा, इंधनाचे मोजमाप तपासणे, प्रथमोपचार किट, आपत्कालीन कॉल या सेवा पेट्रोल पंपावर मोफत देणे बंधनकारक आहे. अन्यथा अशा पंपांवर ग्राहकांच्या सेवेत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली जाऊ शकते.
आजच्या काळात भेसळ आणि उत्पादनांची खालावलेली गुणवत्ता उच्च पातळीवर आहे. कोणत्याही वस्तूची हमी देणे फार कठीण आहे. दशकभरापूर्वी, आपण वाहने, उपकरणे, यांत्रिक उपकरणे, गृहोपयोगी उपकरणे किंवा त्यांचे सुटे भाग हमीपेक्षा जास्त काळ टिकणारे पाहिले, परंतु आता कमकुवत उत्पादनांची निर्मिती केली जात आहे, जणू त्यांना भविष्यच नाही. महागाईनुसार उत्पादनांच्या किमती गगनाला भिडतात, पण गुणवत्तेच्या नावाखाली ते कुठेही टिकत नाहीत. अल्पावधीतच वस्तू निरुपयोगी ठरतात. पूर्वी ग्राहकांना मर्यादित साधनांमधून गुणवत्ता मिळत असे, आता बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या अमर्याद संसाधनांमधून गुणवत्ता शोधूनही ती दिसत नाही.
देशभरात सायबर गुन्हे शिगेला पोहोचले आहेत. दररोज अनेक प्रकरणे पाहिली आणि ऐकली जातात. आपल्याला एसएमएसद्वारे बनावट वेबसाइटच्या लिंक पाठवल्या जातात. अनेक फेक कॉल्स आणि ईमेल्स येतात. देश-विदेशातील नवीन नंबरवरूनही व्हॉट्सअॅपवर मेसेज येतात. आपल्या डिजिटल उपक्रमांची माहिती नोंदवली जाते. या डिजिटल युगात आपली वैयक्तिक माहिती जगभर पसरलेली आहे. आजकाल डिजिटल अटकेच्या घटनाही मोठय़ा प्रमाणात घडू लागल्या आहेत. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 75800 प्रकरणांसह सायबर फसवणुकीच्या घटनांची संख्या 421.4 कोटी रुपयांवरून वाढून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 2054.6 कोटी रुपये झाली. 2024 च्या पहिल्या चार महिन्यांत, भारतीयांना सायबर गुन्हेगारांमुळे 1750 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले. राष्ट्रीय सायबर क्राइम रिपार्ंटग पोर्टलवर 7,40,000 तक्रारी दाखल झाल्या. 76000 बनावट वेबसाईटच्या माध्यमातून 8 लाखांहून अधिक लोक ऑनलाइन फसवणुकीचे बळी ठरले आहेत. नवनवीन पद्धती वापरून स्पॅमर्समुळे ऑनलाइन फसवणूक वाढत आहे.
सर्वच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनी त्यांचा दर्जा आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी कठोर नियम केले आहेत. तरीही त्यांची अंमलबजावणी सक्षमपणे होत नाही. सर्वसामान्यांच्या चांगल्या पोस्टला स्पॅम ठरवून डिलीट केल्याचे अनेकदा दिसून येते. जेव्हा की सोशल मीडिया फसव्या जाहिराती आणि अयोग्य पोस्टने भरलेला असतो. ऑनलाइन उत्पादन शोधत असताना बनावट वेबसाइटदेखील दिसते, ज्यावर उत्पादनाच्या खोटय़ा किमती दाखवून ग्राहकांची खुलेआम फसवणूक केली जाते. अशा खोटय़ा ई-कॉमर्स वेबसाइटस्वर बंदी का नाही? अशा वेबसाइटस्च्या भ्रामक जाहिराती आणि स्वस्त किमतींमुळे लोक अनेकदा फसतात.
जीवरक्षक औषधेही आता जीवघेणी बनली आहेत. ग्राहकाने कोणावर विश्वास ठेवावा आणि कोणावर नाही? आशिया खंडातील सर्वात मोठय़ा रुग्णालयात गणल्या जाणाऱया नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील हजारो रुग्णांना नुकतेच बनावट औषधांचे वाटप करण्यात आले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगातील औषधी व्यापारात बनावट औषधांचा वाटा 10 टक्के आहे. बनावट औषधांची जागतिक बाजारपेठ 200 अब्ज डॉलरची आहे आणि यापैकी 67 टक्के बनावट औषधे मानवी आरोग्यासाठी धोकादायक मानली जातात. भारतीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार, भारतातील 5 टक्के औषधे बनावट आहेत. एसोचैमने 2022 मध्ये केलेल्या अभ्यासानुसार, भारतातील 25 टक्के औषधे बनावट किंवा अत्यंत कमी दर्जाची आहेत.
क्रिसिल आणि ऑथेंटिफिकेशन सोल्युशन प्रोव्हायडर्स असोसिएशनच्या संयुक्त अहवालात म्हटले आहे की, देशात विकल्या जाणाऱया सर्व उत्पादनांपैकी सुमारे 25-30 टक्के बनावट उत्पादने आहेत. बनावट वस्तू, पोशाख 31 टक्के, एफएमसीजी 28 टक्के आणि ऑटोमोटिव्ह 25 टक्के सर्वात जास्त प्रचलित आहे. हे शीर्ष विभाग आहेत जेथे ग्राहकांना बनावट उत्पादने जास्त आढळतात. त्यानंतर 20 टक्के फार्मास्युटिकल्स, 17 टक्के ग्राहक टिकाऊ वस्तू, 16 टक्के कृषी रसायने आहेत. फिक्कीच्या मते, औषधे, मसाले, बेबी फूड, मिनरल वॉटर, सॉफ्टवेअर, सिगारेट, मद्य, सोन्याची बिस्किटे आणि लक्झरी वस्तूंसह बहुतेक उत्पादनांच्या श्रेणींमध्ये बनावट उत्पादने आढळू शकतात. फिक्की पॅस्केडने अहवाल दिला आहे की बनावट उत्पादनांमुळे वार्षिक करांचे नुकसान कोटय़वधी रुपयांमध्ये असल्याचा अंदाज आहे. बनावट ऑटो पार्टस्चे 20 टक्के रस्ते अपघातांमध्ये योगदान आहे आणि भारतात विकल्या जाणाऱया प्रत्येक तीन प्रतिजैविक औषधांपैकी एक बनावट आहे. जर कधी आपण देशी तूप, मध, केशर यांसारखे खाद्यपदार्थ विकत घेतो तेव्हा लोक म्हणतात की ते शुद्ध घेतले नसावे. याचा अर्थ लोकांचा आपल्यापेक्षा बाजारातील भेसळीवर जास्त विश्वास असतो.
मुळात ग्राहकाची जागरुकता आणि तत्परताच फसवणुकीला आळा घालू शकते. कोणतीही वस्तू खरेदी करताना ग्राहक हक्कांची जाणीव ठेवायला हवी. उत्पादन खरेदी करताना, सरकारने निर्देशित केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर नुकसान होत नाही. वस्तूंवर प्रकाशित केलेली माहिती वाचा. शक्य असल्यास वस्तूंची चाचणी घ्या आणि प्रमाणित केंद्रातूनच खरेदी करा. खरेदीचे निश्चित बिल मिळवा. दिशाभूल करणाऱया जाहिरातींसह उत्पादने खरेदी करणे टाळा. उत्पादनाशी संबंधित समस्यांच्या बाबतीत विव्रेत्याशी बोला, विव्रेत्याने विहित नियमांनुसार मदत न केल्यास, अशा परिस्थितीत सरकारी यंत्रणा आपल्याला मदत करण्यास नेहमीच तयार आहे.