गुगल मॅपने केली पोलिसांची फजिती, गावकऱ्यांनी गुंड समजून रात्रभर ओलीस ठेवले; एक पोलीस जखमी

गुगल मॅपमुळे अनेक गाडी चालकांची रस्ता भरकटून फजिती झालेली असताना याचा फटका चक्क पोलिसांनासुद्धा बसला आहे. आसामच्या जोरहाट पोलिसांच्या 16 सदस्यांचे पथक एका आरोपीला पकडण्यासाठी निघाले. घटनास्थळी पोहोचण्यासाठी पोलिसांनी गुगल मॅपची मदत घेतली, परंतु गुगल मॅपने पोलिसांना चुकीचा रस्ता दाखवला अन् पोलीस नागालँडच्या मोकोकचुंग जिल्ह्यात पोहोचले. या ठिकाणी पोहोचल्यानंतर गावकऱयांनी त्यांना घुसखोर समजून त्यांच्यावर हल्ला केला. या सर्वांना रात्रभर ओलीस ठेवले. खरं म्हणजे ज्या ठिकाणी पोलीस पोहोचले, तो नागालँडमधील चहाचा बगिचा होता. मात्र गुगलने तो आसाममधील असल्याचे दाखवल्याने हा सर्व प्रकार घडला. जोरहाट पोलिसांना याची माहिती कळताच त्यांनी मोकोकचुंग पोलीस अधीक्षकांची मदत घेतली. चौकशीसाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. गावकऱयांना जेव्हा ही माहिती कळली तेव्हा त्यांनी जखमींसह पाच जणांची सुटका केली, तर अन्य 11 जणांना रात्रभर पैद करून दुसऱया दिवशी सकाळी सोडून दिले.

गणवेश नसल्याने गोंधळ

प्रवासात पोलिसांनी गणवेश घातला नव्हता. ते साध्या ड्रेसमध्ये होते. तसेच त्यांच्याकडे शस्त्रs होती. त्यामुळे गावकऱयांना वाटले की, हे शस्त्र बाळगणारे गुंड आहेत. गावकऱयांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता थेट पोलिसांवर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला, तर अन्य पोलिसांना रात्रभर ओलीस म्हणून गावात राहावे लागले, हे सर्व गावकऱयांच्या संभ्रमातून घडले.