लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचा मोठा घातपात घडवण्याचा कट आज सुदैवाने उधळला गेला. अज्ञात समाजकंटकांनी मध्य रेल्वेच्या मुख्य रेल्वे मार्गावर शहापूरजवळील आटगाव-तानशेत रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रॅकवर एक-सवा फूट लांबीचा आडवा ठेवला. दैव बलवत्तर म्हणून या मार्गावरून कोणतीही एक्स्प्रेस किंवा अन्य गाडी गेली नाही. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास याच मार्गावरून धावणाऱ्या ओव्हरहेड वायर दुरुस्ती व्हॅनला हा रुळाचा तुकडा लागला आणि या व्हॅनचा डिझेल पाइप फुटला आणि मोठ्या रेल्वे अपघाताचा कट उघडकीस आला.
मध्य रेल्वेच्या आटगाव पोलिसांनी स्थानकापासून साधारण एक किलोमीटर अंतरावर अज्ञात समाजकंटकांनी मुंबईकडून कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन मार्गावर सुमारे सवा फूट लांबीच्या रेल्वे रुळाचा तुकडा आडवा ठेवला. मात्र सुदैवाने या मार्गावरून कोणतीही मेल, एक्स्प्रेस गेली नाही. पहाटे तीनच्या सुमारास ओव्हरहेड वायरची दुरुस्ती करणारी एक व्हॅन मुंबईहून कसाऱ्याकडे जात असताना हा ट्रॅकवर ठेवलेला रुळाचा तुकडा व्हॅनला लागला. त्यामुळे व्हॅनचा डिझेल पाइप फुटला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर मोटरमनने या घटनेची माहिती आटगाव रेल्वे स्टेशन मास्तरांना दिली. त्यानंतर घातपाताच्या या कटाची माहिती रेल्वेच्या सुरक्षा यंत्रणेला कळवण्यात आली. रेल्वे कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने घटनास्थळाकडे रवाना झाले. त्यांनी हा लोखंडी रुळ ट्रॅकमधून बाजूला केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
पहाटे मेल, एक्स्प्रेसची वर्दळ
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर लोकल गाड्यांची वाहतूक बंद झाल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ सुरू असते. मध्यरात्रीनंतर मुंबईतून अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या नाशिकच्या दिशेने रवाना होतात. समाजकंटकांनी हा रुळाचा तुकडा मेल आणि ट्रॅकवर ठेवल्यानंतर सुदैवाने एकही एक्स्प्रेस या मार्गावरून गेली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा घातपात घडवणाऱ्या समाजकंटकांवर झडप घालण्यासाठी कल्याण लोहमार्ग विशेष पथक तयार केले आहे.