कृषीमंत्री धनंजय मुंडे व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी माझी साडेतीन कोटी रुपये किमतीची जमीन हडप केल्याचा खळबळजनक आरोप दिवंगत प्रवीण महाजन यांच्या पत्नी सारंगी महाजन यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. मुंडे यांच्या नोकराने मला व माझ्या कुटुंबाला धाक दाखवून जमीन हडप केली. त्याशिवाय शंभर रुपयांच्या स्टँप पेपरवर सह्याही घेतल्या. सह्या करीत नाही तोपर्यंत परळी सोडू देणार नाही, अशी दमबाजीदेखील केली असल्याचा दावा सारंगी महाजन यांनी केल्याने राजकीय वातावरण आणखी तापले आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रात रोज विविध घडामोडी घडत असून धनंजय मुंडे यांच्यावर नवनवे आरोप होत असल्याने ते चांगलेच गोत्यात आले आहेत. आता तर भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या वहिनी सारंगी महाजन यांनी आज एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना मुंडे बंधू-भगिनींवर अक्षरशŠ आरोपांच्या फैरी झाडल्या. त्या म्हणाल्या की, प्रवीण महाजन यांच्या निधनाला दहा वर्षे उलटली. मात्र मी कधीही धनंजय तसेच पंकजा मुंडे यांच्याकडे एकदाही गेले नाही. त्यांचे राजकारण, सत्ताकारण व समाजकारण त्यांना लखलाभ ठरो. मात्र आपल्या मालकीची जमीन कशी परस्पर विकली गेली याचा पाढाच सारंगी महाजन यांनी वाचला.
महाजन यांनी सांगितले की, माझ्या जमीन विक्रीतही मोठा घोटाळा झाला असून साडेतीन कोटींपेक्षा जास्त किंमत असलेली जमीन फक्त 21 लाखांना विकण्यात आली. माझ्या वाटणीची जमीन मला दाखवली गेली नाही. सातबारावर दुसरीच नावे चढवण्यात आली आणि परस्पर ती जमीन गोविंद मुंडे, दशरथ चाटे आणि पल्लवी गीते यांना विकली, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
अजित पवार यांची घेतली भेट
धनंजय व पंकजा मुंडे यांनी माझी जमीन हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर मी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली असल्याचे सारंगी महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. हे प्रकरण आपण मार्गी लावून देतो, असे आश्वासन अजित पवार यांनी दिल्याचे सारंगी महाजन यांनी स्पष्ट केले. लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.