कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्यासाठी आर्थिक ताकद वापरणार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा डिवचले

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कॅनडाला डिवचले आहे. कॅनडाला अमेरिकेचा भाग बनवण्यासाठी आर्थिक ताकद वापरणार असे विधान त्यांनी केले आहे. यावर कॅनडाचे पंतप्रधान यांनीही संताप व्यक्त केला आहे. फ्लोरिडाच्या मार ए लागो येथे पत्रकारांनी ट्रम्प यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी कॅनडावर ताबा मिळवण्यासाठी सैन्यबळाचा वापर करणार का, असा सवाल केला असता नाही असे उत्तर ट्रम्प यांनी दिले.

ट्रम्प म्हणाले, आर्थिक ताकद वापरणार, कारण कॅनडा आणि अमेरिकेदरम्यान आर्टिफिशियल स्वरूपात आखण्यात आलेल्या रेषेपासून सुटका होईल आणि त्यानंतर कळेल की ती रेषा कशी दिसते. तसेच हे राष्ट्रीय सुरक्षेसाठीही उत्तम असेल. अमेरिकेने नेहमीच कॅनडाचे संरक्षण केले आहे ही गोष्ट विसरू नका, असेही ट्रम्प म्हणाले.

कॅनडाच्या सुरक्षेवर दरवर्षी अब्जावधी खर्च

कॅनडाच्या लोकांबद्दल मनात प्रेम आहे. परंतु,अमेरिका आता कॅनडाला आर्थिक स्वरूपात समर्थन देऊ शकत नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मला कॅनडाचे लोक खूप आवडतात ते महान आहेत. कॅनडाच्या डेअरी उत्पादनांचीही आता अमेरिकेला गरज नाही. ते आमच्यासाठी 20 टक्के वाहने बनवतात. परंतु, आता आम्हाला त्याची गरज नाही. मग आम्ही दरवर्षी कॅनडाच्या सुरक्षेवर 200 हून अधिक अमेरिकन डॉलर का खर्च करत आहोत, असा सवालही ट्रम्प यांनी केला आहे.

कॅनडाला युरोपियन संघातही ठेवणार नाही

जर ते एक राज्य असेल तर ठीक आहे परंतु, एका देशाला इतक्या मोठय़ा प्रमाणावर सबसिडी देऊन आम्ही काय मिळवतोय? कॅनडाला आम्ही युरोपियन संघातही ठेवणार नाही. कॅनडामुळे तब्बल 350 अमेरिकन डॉलरचे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

अनिता आनंद बनू शकतात पंतप्रधान

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टडो यांच्या राजीनाम्यानंतर भारतीय वंशाच्या खासदार अनिता आनंद यांच्या नावाचा पंतप्रधानपदासाठी विचार सुरू आहे. सत्ताधारी लिबरल पार्टी यंदा होणाऱ्या संसदीय निवडणुकीपूर्वी नवीन पंतप्रधान निवडू शकतो.