जिह्यातील काही गावांत अचानक केस गळतीचे प्रमाण वाढले असून तीन दिवसांत टक्कल होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा प्रकार उघडकीस येताच आरोग्य पथकाने शेगाव तालुक्यातील सहा गावांना भेट दिली. त्वचारोगामुळे हा प्रकार घडत असल्याचा प्राथमिक अंदाज असून सात जणांच्या त्वचेचे नमुने अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठवण्यात आले आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांनी सांगितले.
बुलढाणा जिह्यातील शेगाव तालुक्याच्या बोंडगाव, कालवड, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, घुई या गावांत अचानक केस गळती होत असल्याच्या घटना समोर आल्या. केस गळण्यास सुरुवात होते आणि तीन दिवसांत टक्कल होत असल्याने या गावांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या ‘टक्कल व्हायरस’ची लागण अनेकांना झाली आहे. सुरुवातीला काही जणांनी खासगी उपचार घेतले. शाम्पू किंवा पाण्यातील क्षारामुळे केसगळती होत असावी, अशी शंका होती. परंतु याचे प्रमाण वाढले.
आरोग्य पथक शेगावात धडकले
‘टक्कल’ व्हायरसची माहिती मिळाल्यानंतर आरोग्य विभागही खडबडून जागा झाला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते हे स्वतः त्वचारोग तज्ञांसह आरोग्य पथक घेऊन शेगावात धडकले. केस गळतीची लागण झालेल्या गावांना या पथकाने भेट दिली. बोंडगाव येथे 16, कालवड येथे 13, कठोरा येथे 7 तर भोनगाव येथे 3, हिंगणा वैजिनाथ येथे 6 आणि घुई येथे 7 जणांना पूर्ण टक्कल पडलेले दिसून आले. त्वचारोगतज्ञ डॉ. बालाजी आचरट, डॉ. तांगडे, डॉ. बाहेकर यांनी यापैकी सात जणांच्या त्वचेचे नमुने बायोप्सी चाचणीसाठी घेऊन अकोला येथे पाठवले. मात्र त्वचारोगाचाच हा प्रकार असावा, असा अंदाज या तज्ञांनी व्यक्त केला. अगोदर डोक्याला प्रचंड खाज सुटते. खाजवताना केस हाती येतात. तिसऱया दिवशी सरळ तुळतुळीत टक्कल पडते अशी या त्वचारोगाची लक्षणे दिसून आली आहेत.