तीन दिवसीय कोळी सी फूड फेस्टिव्हल 10 जानेवारीपासून वेसाव्यात रंगणार आहे. वेसावा मच्छीमार सहकारी सोसायटीच्या समोरील गणेश मंदिराच्या मैदानात 12 जानेवारीपर्यंत हा कोळी महोत्सव साजरा होणार आहे. शिक्षणमहर्षी अजय कौल यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. उद्योजक कृष्णराव पिंपळे, कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी आमदार रमेश पाटील, ओएनजीसी, मुंबईचे प्रादेशिक निर्देशक रविशंकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असेल.
यंदा महोत्सवाचे 18 वे वर्ष असून मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण, अंबरनाथ येथील 50 हजारांहून अधिक नागरिक उपस्थित राहणार असल्याची माहिती फेस्टिव्हलचे अध्यक्ष महेंद्र लडगे यांनी दिली. दरवर्षी या महोत्सवाच्या माध्यमातून कोळी समाजाची संस्कृती, परंपरा, खाद्यपद्धती आणि जेवणाची लज्जत अनुभवायला मिळते. मासळीच्या विविध जाती, पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन, विक्री, वेसावकरांचे कोळीनृत्य व परंपरा आदींचे दर्शनही या महोत्सवात होते.