अहिल्यानगरमध्ये दहा वर्षांनंतर उडणार ‘महाराष्ट्र केसरी’चा धुरळा, 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान रंगणार स्पर्धा

महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या अहिल्यानगरमध्ये तब्बल दहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचा धुरळा उडणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने व अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या सहकार्याने ऐतिहासिक वाडिया पार्क मैदानावर 67 व्या वरिष्ठ माती व गादी राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व ‘महाराष्ट्र केसरी’ किताब स्पर्धा 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारीदरम्यान रंगणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघास संलग्न असलेले 36 जिल्हे व 6 महापालिका असे एकूण 42 संघ या स्पर्धेत सहभागी होणार असून, एकूण 840 कुस्तीपटू आखाडय़ात काwशल्य पणाला लावणार आहेत.

‘महाराष्ट्र केसरी’च्या तयारीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत स्पर्धा आयोजक आमदार संग्राम जगताप, राज्य कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप भोंडवे व सरचिटणीस ‘हिंद केसरी’ योगेश दोडके यांनी ही माहिती दिली. यावेळी राज्य कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष अर्जुन शेळके, अशोक शिर्के, गुलाब बर्डे, सचिव प्रा. संतोष भुजबळ, सहसचिव प्रवीण घुले आदी उपस्थित होते. 100 पंच व 80 पदाधिकारी यांच्या सहकार्याने या महाराष्ट्रातील प्रतिष्ठsची स्पर्धा पार पडणार आहे. याआधी 2014 साली अहिल्यानगरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात उदय झालेल्या विजय चौधरीने ‘महाराष्ट्र केसरी’ची मानाची गदा पटकाविली होती.

अहिल्यानगरमध्ये अवतरणार रथी-महारथी मल्लांची मांदियाळी

यंदाच्या‘ महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत ‘महाराष्ट्र केसरी’ शिवराज राक्षे, सिकंदर शेख, हर्षवर्धन सदगीर, बाला रफीक शेख, महेंद्र गायकवाड, पृथ्वीराज मोहोळ, वेताळ शेळके, माऊली कोकाटे, शुभम शिंदनाळ, सुदर्शन कोतकर, माऊली जमदाडे हे कुस्तीपटू प्रमुख आकर्षण असतील.