चॅम्पियन्स ट्रॉफीवर असलेला धोका अद्याप टळलेला नाही. आधी हिंदुस्थानने खेळण्यास नकार दिल्यामुळे स्पर्धेचे आयोजन अडचणीत सापडले होते. त्यावर तोडगा निघत नाही तोच पाकिस्तानने आता आयसीसीचे टेन्शन आणखी वाढवलेय. स्पर्धा 40 दिवसांवर आली असूनही स्टेडियमचे बांधकाम अपूर्णावस्थेत असल्यामुळे पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा धोक्यात सापडली आहे. त्यामुळे अर्धवट अवस्थेत असलेल्या स्टेडियम्समुळे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या यूएई स्थलांतराच्या चर्चांना पुन्हा उत आलाय तर स्टेडियम लवकरच पूर्ण होतील असा विश्वास पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) व्यक्त करत मुलतानमध्ये होणाऱया तिरंगी स्पर्धेचे आयोजन लाहोर आणि कराचीत करणार असल्याचे जाहीर करून आयसीसीला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे.
येत्या 19 फेब्रुवारी ते 9 मार्चदरम्यान आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळविली जाणार असून या स्पर्धेच्या आयोजनासाठी पाकिस्तानने स्टेडियम्सचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार कराचीतील नॅशनल स्टेडियम, लाहोरमधील गद्दाफी स्टेडियम आणि रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम येथे बांधकाम आणि अपग्रेडेशनचे काम अजूनही सुरू आहे आणि ही तिन्ही स्टेडियम आयसीसीकडे सोपवण्याची वेळ जवळ आली आहे. कराची आणि लाहोर येथे स्टेडियमचे अर्धेअधिक काम अजूनही शिल्लक आहे. त्यात खुर्च्या, फ्लडलाइट्स, अत्याधुनिक सोयीसुविधा आणि खेळपट्टीसह अनेक कामे शिल्लक असल्यामुळे आयसीसी चिंतेत सापडलीय. येत्या 25 जानेवारीपर्यंत ती कामे पूर्ण होण्याची शक्यताही नसल्याचे आयसीसीचे मत आहे.
…तर पाकिस्तानचे यजमानपद आयसीसी हिसकावून घेईल
आयसीसीने स्टेडियम्स निर्मितीसाठी पीसीबीला 31 डिसेंबरच डेडलाईन दिली होती. पण अजूनही स्टेडियमच्या निर्माणाची स्थिती चिंताजनक असल्याचे चित्र समोर आले आहे. स्टेडियमचे काम पूर्ण करण्यासाठी पीसीबी युद्धपातळीवर तयारी करत असल्यामुळे या स्पर्धेचे आयोजनच धोक्यात आले आहे. आयसीसीने पीसीबीला स्टेडियमचे अर्धवट कामे पूर्ण करण्यासाठी 25 जानेवारी ही नवी डेडलाईन दिली आहे. या डेडलाईनदरम्यान स्टेडियमची पाहणी करून आयसीसी स्पर्धा यूएईत स्थलांतरित करायची की पाकिस्तानात खेळवायची याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे आपण स्पर्धेपूर्वी तिन्ही स्टेडियमची कामे शंभर टक्के पूर्ण करू, असा विश्वास देण्यासाठी पाकिस्तान, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 8 ते 12 फेब्रुवारीदरम्यान मुलतान येथे खेळविली जाणारी तिरंगी मालिका आता कराची आणि लाहोरच्या स्टेडियमवर खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ही स्पर्धा आयसीसीच्या नव्या डेडलाईनच्या दोन आठवडय़ांनी खेळविली जाणार आहे. त्यामुळे पीसीबीला दुसरी डेडलाइनही पाळता आली नाहीतर आयसीसी ही स्पर्धा यूएईला स्थलांतरित करू शकते. तसेही हिंदुस्थानी संघ पाकिस्तानात खेळत नसल्यामुळे हिंदुस्थानसह उपांत्य आणि अंतिम फेरी दुबईतच खेळविली जाणार आहे. त्यातच हिंदुस्थानचा पाकिस्तानला विरोध असल्यामुळे पाकिस्तानचे यजमानपद आयसीसी हिसकावून घेईल, अशी भीती आतापासूनच पीसीबीच्या मनात घर करून बसली आहे. पाकिस्तानची चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा संकटात सापडली असून आयसीसीला आपले वाढलेले टेन्शन कमी करण्यासाठी यूएईलाही स्पर्धेच्या आयोजनासाठी तयारीत राहण्याचा इशारा द्यावा लागणार आहे.