”अजित पवार गटाचे प्रमुख हे अजितदादा आहेत. मात्र तुम्ही याच्या खोलात गेल्यास असं दिसतं की, त्या पक्षात सुनील तटकरे यांचं जास्त चालतं”, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे काही खासदार हे अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा आज सकाळपासून राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरच भाष्य करताना एका आयोजित पत्रकार परिषदेत रोहित पवार असं म्हणाले आहेत.
रोहित पवार म्हणाले की, ”सुनील तटकरे यांनी आमच्या पक्षातील खासदारांशी संपर्क केला, अशी चर्चा आहे. समोरच्या बाजूने कितीही प्रयत्न झाले तरी आमच्या पक्षाचे खासदार किंवा आमदार वेगळा निर्णय घेतील, असं वाटत नाही.”
रोहित पवार पुढे म्हणाले, ”अजित पवार गटात असणारे नेते शरद पवार यांचा आदर करत असावेत, मात्र सुनील तटकरे यांच्याबाबतीत असं मला म्हणता येणार नाही. तटकरे हे प्रॅक्टिकल नेते आहेत. जसा वारा येणार, तशा पद्धतीने ते वक्तव्य करतात आणि भूमिका घेतात. आज ते भाजपसोबत सत्तेत आहेत. त्यांच्या ज्या अडचणीत आहेत, त्या बऱ्यापैकी सुटलेल्या आहेत. त्यामुळे भूमिका घेत असताना ते व्यक्तिगत भूमिका घेतात. अजित पवार गटाबद्दल बोलायचं झालं तर अजित पवार हे त्या पक्षाचे प्रमुख नेते आहेत. मात्र याच्या खोलात गेल्यास असं लक्षात येतं की, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं पक्षात जास्त चालतं.”