जम्मू कश्मीर येथे तैनात असलेल्या जवानाने एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. कृष्ण कुमार यादव असे त्या जवानाचे नाव असून त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपवले. यादवला एक तरुणी गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत होती व त्याचे पैसे लुटत होती. त्या जाचाला कंटाळून कृष्णकुमारने स्वत:चे आयुष्य संपवले. कृष्णकुमारने एक सुसाईड नोट लिहून त्याच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला,
कृष्णकुमार हा मूळचा राजस्थानमधील जयपूरच्या अमरसर गावचा रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी तो सुट्टीवर असताना सिकर जिल्ह्यातील जिनमाता भागात गेला होता. तिथे काही लोकांनी त्याला ड्रग्ज दिले व त्याचे एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो व व्हिडीओ काढले. नंतर त्याच फोटो व व्हिडीओ च्या आधारे त्या महिलेने दोन वर्षांपासून कृष्णकुमारकडून 15 लाख उकळले होते. त्यामुळे कृष्णकुमार त्रासला होता.
लष्करातील काही नियमांमुळे त्याला पोलीस तक्रारही करता येत नव्हती. त्यामुळे या प्रकारातून आपली सुटका होणार नाही असे कृष्णकुमारला वाटत होते. या सर्व प्रकाराने नैराश्यात गेलेल्या कृष्णकुमारने 4 जानेवारीला स्वत:कडील बंदूकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. कृष्णकुमार याच्या पालकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.