धनंजय मुंडेंना आता स्वपक्षीयांचाही विरोध; राजीनाम्यासाठी दबाव वाढला

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणानंतर मंत्री धनंजय मुंडेच्या राजीनाम्याठी दबाव वाढत आहे. विरोधकांसह आता स्वपक्षीयांनीही धनंजय मुंडेंना राजीनाम्यासाठी घेरल्याचं दिसत आहे. संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना आणि परभणीतील आंबेडकरी कार्यकर्ते नवनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोपींना कडक शासन करावं या मागणीसाठी आंदोलन होत आहे. त्यामुळे आता राजीनाम्यासाठी धनंजय मुंडे यांच्यावर दबाव वाढत असल्याचे दिसत आहे.

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरातील वातावरण प्रचंड तापले आहे. या हत्याप्रकरणात रोज नवनवे खुलासे होत आहेत. विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. तसेच मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड यांचे नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरला आहे.

संतोष देशमुख हत्याप्रकरण आणि खंडणीप्रकरणी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांच्या आवाजाचे पुरावे पोलीस घेणार आहे. विष्णू चाटे यांच्या आवाजचे सँपल पोलिसांनी घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीदेखील या प्रकरणात बड्या नेत्याचा हात असल्याचा दावा केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला धमक्या येत असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. तसेच विरोधकांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. तसेच दमानिया यांनीही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील दबाव वाढत आहे.

ज्यांनी कुणी हा गुन्हा केलाय त्यांना या प्रकरणाचं गांभीर्यच नाही. त्यामुळं याप्रकरणी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे धनंजय देशमुख यांनी सांगितले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ज्या लोकांवर अजूनही संशय आहे. त्या लोकांवर विविध गुन्हे असतानाही पोलीस संरक्षण दिले गेले होते. मात्र आता या प्रकरणाची गृह खात्याने दाखल घेण्याची गरज आहे असंही धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.