हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूनम ढिल्लो यांच्या घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी पूनम यांच्या घरी मोठा डल्ला मारला असून हिऱ्याचा हार, 35 हजार रुपये आणि अमेरिकन डॉलर्स लंपास केले. याप्रकरणी पूनम ढिल्लो यांनी पोलिसांना तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. समीर अंसारी, असे आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पूनम यांच्या घरी रंगरंगोटीचे काम सुरू होते. त्यामुळे आरोपी गेल्या काही दिवसांपासून पूनम यांच्या घरी पेंटिंगचे काम करत होता. यावेळी त्याची नजर घरतील उघड्या कपाटावर गेली. आणि वेळ साधून आरोपी समीरने घरातील मौल्यवान वस्तू आणि रोख रक्कम पळवली. पूनम ढिल्लो यावेळी आपल्या घरी नसून त्यांचा मुलगा अनमोल याच्या खार येथील घरात होत्या. त्यामुळे त्यांना घरातील चोरीबाबत कल्पना नव्हती.
पूनमचा मुलगा दुबईहून घरी परतला तेव्हा त्याला घरातून मौल्यवान वस्तू गायब असल्याचे दिसले. यामुळे कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली. चोरीची माहिती मिळताच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी समीर अन्सारीला अटक केली. पेंटिंगच्या कामादरम्यान अन्सारी 28 डिसेंबर ते 5 जानेवारी या कालावधीत पूनम ढिल्लोच्या घरी होता. पोलिसांनी समीर अन्सारीची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.