संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा प्रमुख आरोपी वाल्मीक कराडचा चौकशीचा फास दिवसेंदिवस आवळला जात आहे. या हत्याप्रकरणाचे मूळ असणाऱ्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड याच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास सध्या वेगाने सुरु आहे. वाल्मीक कराडने पवनचक्कीची निर्मिती करणाऱ्या आवादा एनर्जी या कंपनीकडून 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. वाल्मिक कराड याने आरोपी विष्णू चाटे याच्यामार्फत कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. नंतर विष्णू चाटे हाच आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना घेऊन वाल्मीक कराड यांना भेटण्यासाठी गेला होता, असा आरोप आहे. त्यादृष्टीने आता पोलीस तपास करत असून त्यांनी विष्णू चाटे याचे व्हॉईस सॅम्पल्स घेतले आहेत.
विष्णू चाटेचा मोबाईल अद्याप पोलिसांना सापडलेला नाही, त्याचाही तपास सध्या सुरु आहे. त्याच खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडचेही व्हॉईस सॅम्पल तपासले जाणार आहेत. मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे व्हाईस सॅम्पल सीआयडीकडून कलेक्ट करण्यात आले आहेत. वाल्मीक कराडने अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो. तर वाल्मीक कराड याचेही व्हाईस सॅम्पल घेऊन ते मॅच होतात का हे तपासले जाणार आहेत. त्यामुळे या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संतोष देशमुख हत्याप्रकरणी पुन्हा संभाजी वायबसे व सुरेखा वायबसे या दोघांची सीआयडीकडून पुन्हा चौकशी होणार आहे. यापूर्वीही संभाजी वायबसे आणि सुरेखाबाई वायभसे यांची सीआयडीने चौकशी केली होती, मात्र त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आले होते. आम्ही पुन्हा गरज लागल्यास तुम्हाला चौकशीला बोलावून घेऊ, असे सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी वायबसे दाम्पत्याला सांगितले होते. या हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा अद्याप फरार आहे. त्याच्या तपासासंदर्भात वायबसे दाम्पत्याची चौकशी होऊ शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.