अक्षय कुमारचा ‘स्काय फोर्स’ वादाच्या भोवऱ्यात, प्रसिद्ध लेखकाने दिला अल्टिमेटम

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारचा अपकमिंग सिनेमा स्काय फोर्स वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या सिनेमाबाबत एका प्रसिद्ध लेखकाने सिनेनिर्मात्याला कोर्टात खेचण्याची भाषा केली आहे. हा सिनेमा 24 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार असून त्याआधीच सिनेमा अडचणीत सापडला आहे.

प्रसिद्ध गीतकार-पटकथाकार मनोज मुंतशीर यांनी सिनेमाच्या निर्मात्यांना न्यायालयात नेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. ‘स्काय फोर्स’च्या टीमने ‘माये’ या आगामी गाण्याचे श्रेय मनोज मुंतशीर यांना न दिल्याने हा संपूर्ण वाद सुरू झाला.मंगळवारी सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. जिओ सिनेमाने ‘माये’ गाण्याचा टीझर ट्विटर आणि अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला होता. या गाण्याला बी प्राक यांनी आवाज दिला असून तनिष्क बागची यांनी संगीत दिले आहे. या पोस्टमध्ये बी प्राक आणि तनिष्क बागची या दोघांनाही श्रेय देण्यात आले आहे, मात्र मनोज मुंतशीरचा उल्लेखही करण्यात आलेला नाही.

मनोज मुंतशीर यांना ही गोष्ट खटकली. त्याने सिनेनिर्माते, जियो सिनेमा, मॅडॉक आणि सारेगामा ग्लोबल यांना कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला आहे. याबाबत मनोज मुंतशीर यांनी एक्सवर संताप व्यक्त केला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत त्यात लिहीले की, – “कृपया @jiostudios, @MaddockFilms @saregamaglobal वर लक्ष द्या. हे गाणे केवळ गायले आणि संगीत दिलेले नाही तर ते अशा व्यक्तीने लिहिले आहे ज्याने यासाठी आपले सर्व मेहनत पणाला लावली आहे. त्यांनी पुढे लिहिले- “सुरुवातीच्या श्रेयांमधून लेखकांची नावे काढून टाकणे म्हणजे सिनेमाचा अनादर होतो. उद्या प्रदर्शित होणाऱ्या मुख्य गाण्यासह हे तात्काळ दुरुस्त न केल्यास, मी ते गाणे नाकारेन आणि देशाच्या कायद्यानुसार माझा आवाज ऐकला जाईल याची खात्री करेन. लाजिरवाणी गोष्ट आहे. @IPRSmusic.” असे लिहीले आहे.

या सिनेमात अक्षय कुमार व्यतिरिक्त यात वीर पहाडिया, सारा अली खान आणि निम्रत कौर यांच्याही भूमिका आहेत. त्याची कथा 1965 मध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धावर आधारित आहे.