अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? संजय राऊत यांनी सांगितलं पडद्यामागचं राजकारण

अजित पवार गटाकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सात खासदार फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी या खासदारांशी संपर्कही साधला होता. राज्यातील सत्तेत सहभागी असताना आणि विधानसभेत यश मिळूनही अजित पवार गटाकडून राष्ट्रवादीचे खासदार फोडण्याचा प्रयत्न का होतोय? यामागील कारण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत खासदार फुटत नाही तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही. प्रफुल्ल पटेल यांना हे मंत्रीपद हवे असून केंद्रात मंत्रीपदाचा जो कोटा आहे तो पूर्ण करण्यास त्यांना सांगितले आहे. यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सहा ते सात खासदार फोडा आणि मंत्रीपद मिळवा, अशी ऑफर देण्यात आली आहे. म्हणूनच खासदार फोडण्याचे कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. पण हा निर्लज्जपणा असून ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकूनही फोडाफोडी सुरू असेल तर या देशाचे भाग्य तुम्ही काळ्याकुट्ट शाईने लिहित आहात.

भाजपकडून लोकशाही ‘हायजॅक’, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचं मांजर; संजय राऊत यांचा घणाघात

आज त्यांच्याकडे सत्ता असून दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत. त्यांच्याकडे ईडी, सीबीआय, पैसा आहे. त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे. पण त्या आमदार, खासदारांचे भविष्य काय? त्यांना काय मिळणार आहे? त्यांच्या तोंडावर चघळायला हाडकेच पडणार असून आमदार, खासदारांना फोडण्याच्या प्रयत्नामुळे मोदी, शहा, फडणवीस यांचा मुखवटा गळून पडत आहे. मरेपर्यंत हेच करणार का? तुमच्याही राजकीय तिरड्या उचलल्या जाणार असून तेव्हा काय करणार? असा सवाल करत देशाची, लोकशाहीची वाट लावणारे लोक म्हणून तुमचा इतिहास लिहिला जाईल, असा हल्लाबोलही राऊत यांनी केला.

अजित पवार गटाला भाजपची लागण, राष्ट्रवादीचे 7 खासदार फोडण्याचा प्रयत्न