रमाधाममध्ये मातृशक्तीला अभिवादन, माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा

लाखो शिवसैनिकांच्या लाडक्या माँसाहेब स्वर्गीय सौ. मीनाताई ठाकरे यांच्या 94 व्या जन्मदिनानिमित्त विविध ठिकाणी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमातदेखील माँसाहेबांच्या आठवणींना उजाळा देत मातृशक्तीला अभिवादन करण्यात आले. माँसाहेबांच्या अनेक आठवणी जागवण्यात आल्या तेव्हा रमाधामचा संपूर्ण परिसर गहिवरून गेला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः पुढाकार घेऊन माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांची भव्य वृद्धाश्रम उभारण्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारली. या पवित्र वास्तूशी अनेकांचे भावनिक नाते जोडले गेले असून आजी-आजोबांची ममतेने सर्व प्रकारची काळजी घेण्यात येते. माँसाहेबांचा जन्मदिन हा ममता दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात असतानाच खोपोलीच्या रमाधाम वृद्धाश्रमातदेखील आज सकाळपासून मातृशक्ती व भक्तीचा अनोखा संगम बघायला मिळाला.

रमाधामच्या निसर्गरम्य वातावरणात सुश्राव्य भजनाचे सूर गुंजले.  त्यामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. आज दिवसभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. रमाधामचे अध्यक्ष चंदुमामा वैद्य, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, लोकाधिकार समितीचे वामन भोसले यांनी माँसाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी बोलताना चंदुमामा वैद्य यांनी सांगितले की, वृद्धांची सेवा करण्याची माँसाहेबांनी सुरू केलेली परंपरा अजूनही सुरू असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रमाधामच्या प्रत्येक घडामोडींवर विशेष लक्ष असल्याचेही सांगितले.

या वेळी दिवंगत शिवसेना नेते व रमाधामचे माजी ट्रस्टी सतीश प्रधान तसेच दिवंगत मेघना कीर्तिकर यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी माजी तालुकाप्रमुख सुरेश कडव, धाराशीव संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, खडकवासला संपर्कप्रमुख राजेश खाडे, शिवसेना तळोजा शहर समन्वयक अभिमन्यू गोरे, महेंद्र दुबे, अजिंक्य गणगे, अशोक गणके आदी उपस्थित होते.