26/11च्या दहशतवादी हल्ल्यानंतर कुलाबा येथील ताज हॉटेल व परिसरातील सुरक्षेबाबत विशेष काळजी घेतली जात असताना आज ताजजवळ एकच नंबर प्लेटच्या दोन गाडय़ा आढळल्याने खळबळ उडाली. मात्र चौकशीत वेगळाच प्रकार समोर आला.
नरीमन पॉइंट येथे राहणाऱ्या साकीर अली यांची पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी आर्टिगा ही गाडी असून तिचा नंबर एमएच 01 ईई 2388 असा आहे; परंतु हा नंबर अन्य कोणीतरी वापरत असल्याने त्या गाडीवरील ई-चलान अली यांना येत होते. गेले कित्येक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. अली आपला नंबर वापरणाऱ्या त्या कारचा शोध घेत होते. अखेर आज ताज हॉटेल परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पांढऱ्या रंगाची मारुती सुझुकी अर्टिगा व तिला एमएच 01 ईई 2388 असाच नंबर असलेली ती कार अली यांच्या नजरेस पडली. त्यामुळे अली यांनी लागलीच ती कार थांबवून चालकाकडे विचारणा केली. मग त्या गाडीसह चालकाला कुलाबा पोलीस ठाण्यात नेले. कुलाबा पोलिसांनी केलेल्या चौकशीत नवी मुंबईतल्या सीवूड येथे राहणाऱ्या प्रसाद कदम (38) याने त्याच्या कारचा मूळ नंबर एमएच 01 ईई 2383 असा असताना तो जाणीवपूर्वक एमएच 01 ईई 2388 असा केल्याचे आढळून आल्याने कुलाबा पोलिसांनी त्याला अटक करून गाडी जप्त केली. फायनान्स कंपनीकडून जप्तीची कारवाई टाळण्यासाठी प्रसादने ही शक्कल लढवली होती.