मुंबईसाठी यंदाचा रणजी मोसम चांगलाच यशस्वी ठरला आहे. येत्या 23 जानेवारीपासून बीकेसीतील शरद पवार ऍकेडमीच्या मैदानावर जम्मू आणि कश्मीरविरुद्ध भिडणार आहे. या लढतीत कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैसवालने मुंबईसाठी खेळायलाच हवे, असा सल्ला मुंबई क्रिकेटच्या निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने संजय पाटील यांनी दिला आहे.
पाटील पुढे म्हणाले, स्थानिक क्रिकेटचे हात पकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या क्रिकेटपटूंनी जेव्हा कधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळेल तेव्हा सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंनी आवर्जून देशांतर्गत क्रिकेट खेळायलाच हवे. वाईट काळामध्ये हेच क्रिकेट खेळाडूंच्या फॉर्मसाठी संजीवनी बुटी ठरते, याचा सर्वांनी विचार करायला हवा. दोन दशकांपूर्वी सचिन असो किंवा संजय, ते मुंबईसाठी क्रिकेट खेळायचे. पण आता गेल्या दोन दशकांत चित्र काहिसे बदलले होते. पण गेल्या वर्षीपासून बीसीसीआय सचिव जय शाह आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांच्या कठोर भूमिकेमुळे बहुतांश क्रिकेटपटू पुन्हा देशांतर्गत क्रिकेट खेळू लागले आहेत. रोहितसाठी 2024 साल अत्यंत निराशेचे गेलेय. त्यामुळे त्याने नव्या वर्षात मुंबई क्रिकेटच्या रणांगणात पुन्हा उतरावे आणि आपला हरवलेला फलंदाजीचा सूर मिळवावा यासाठी मुंबई क्रिकेट सदैव रोहितच्या पाठीशी असेल, असा विश्वासही संजय पाटील यांनी व्यक्त केला.