माघी गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना 100 टक्के बंदी राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने आज जाहीर केले आहे. याबाबत पालिकेने आज नियमांचे परिपत्रकच जारी केले आहे. त्यामुळे ‘आम्ही पीओपीची मूर्ती’ आणणार नाही, असे लिखित हमीपत्र मंडळांना पालिकेकडे सादर करावे लागणार आहे.
गणेशभक्तांना प्रतीक्षा लागून राहिलेला माघी गणेशोत्सव 1 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यामुळे मंडळांकडून उत्सवाची तयारीही सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून रस्त्यावर व फुटपाथवर मंडप उभारून साजरा करण्यात येणाऱया गणेशोत्सवाच्या मंडप परवानगीसाठी प्रशासकीय विभाग कार्यालयातील संबंधित कर्मचारी, अधिकारी आणि गणेशोत्सव मंडळांकरिता मार्गदर्शक सूचना, नियम जारी करण्यात आले आहेत. माघी गणेशोत्सवाच्या परवानगीसाठी ‘एक खिडकी’ पद्धतीने ऑफलाइन परवानगी देण्यात येणार आहे. तसेच मंडळांना उत्सवासाठी 100 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. ऑफलाइन पद्धतीने येणाऱया अर्जांची विभाग कार्यालयाकडून छाननी करून वाहतूक पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेता येणार आहे.
घरगुती मूर्तीही पर्यावरणपूरकच असाव्यात
मुंबई उच्च न्यायालयातील याचिका क्र. 96/2024च्या दि. 30/8/2024 च्या सुनावणीत दिलेल्या आदेशानुसार सर्व सार्वजनिक मंडळांनी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने 12/5/2020 रोजी मूर्ती विसर्जन सुधारित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे अनिवार्य करण्यात आहे. यानुसार प्रामुख्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींची स्थापना करणार नाही या अटीचे पालन करावे. शिवाय घरगुती गणेशमूर्ती पर्यावरणपूरक साहित्याने घडविलेल्या असाव्यात. तसेच त्यांचे विसर्जन स्वतःच्या घरात, गृहसंकुल आवारात किंवा कृत्रिम तलावात करावे.