भाजप नेते रमेश बिधुरींचे वादग्रस्त वक्तव्य, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशींना अश्रू अनावर

प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर आता दिल्लीतील भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिधुरी यांनी आतिशी यांच्या 80 वर्षीय वडिलांवर टीका केली. त्याबाबत पत्रकार परिषदेत विचारताच आतिशी या भावूक झाल्या व त्यांना अश्रू अनावर झाले.

रमेश बिधुरी यांनी एका प्रचार सभेत बोलताना म्हणाले की, आतिशी यांनी आपले वडील बदलले आहे. पूर्वी त्या आतिशी मार्लेना होत्या आता त्या सिंह झाल्या आहेत”. त्यांच्या या वक्तव्यावरून मोठा गदारोळ झाला. बिधुरी यांनी माफी मागावी अशी मागणी आपने केली आहे.

याबाबत एका पत्रकार परिषदेत आतिशी यांना विचारले असता त्या भावूक झाल्या. ”मला रमेश बिधुरी यांना सांगायचे आहे की माझे वडील शिक्षक होते. त्यांनी हजारो गरीब मुलांना शिकवले. आज ते 80 वर्षाचे आहेत. ते चालू देखील शकत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी एका वृद्ध व्यक्तीला शिवीगाळ केली जात आहे. इतकी घाणेरडी गोष्ट केली जात आहे. या देशाचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकते याची कल्पनाही करु शकत नाही, असे आतिशी म्हणाल्या.