मिरची पावडरसाठी तिखालाल हे नाव वापरल्याप्रकरणी एव्हरेस्ट कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयाने याचिकेची दखल घेत मिरची पावडरसाठी तिखालाल हे नाव वापरू नका, असे निर्देश प्रतिवादी कंपनीला दिले आहेत. त्याचबरोबर हायकोर्टाने संबंधित कंपनीला ट्रेडमार्कच्या उल्लंघनप्रकरणी दोन लाखांचा दंड ठोठावत चार आठवडय़ांत हे पैसे याचिकाकर्त्या कंपनीला देण्याचे आदेश दिले आहेत.
एव्हरेस्ट कंपनीच्या मसाल्यासाठी, मिरची पावडरसाठी तिखालाल हे नाव गेल्या अनेक वर्षांपासून वापरले जाते. त्यासाठी कंपनीने ट्रेडमार्कची नोंदणी केली आहे असे असताना शाम धनी इंडस्ट्रीज कंपनीने मिरची पावडरचे उत्पादन शाम तिखालाल मिरची पावडर या नावाने बाजारात विकण्यास सुरुवात केली. बाजारात एव्हरेस्ट तिखालाल या नावाने मिरची पावडर विकली जात असतानाच शाम धनी कंपनीने मिरची पावडरच्या उत्पादनासाठी तिखालाल हे नाव वापरल्याने ट्रेडमार्कचे उल्लंघन झाल्याचा दावा करत एव्हरेस्ट पंपनीने हायकोर्टात धाव घेतली. या याचिकेवर न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिकेची दखल घेत तसेच पुरावे विचारात घेता शाम धनी कंपनीला तिखालाल हे नाव वापरण्यास बंदी घातली. इतकेच नव्हे तर दोन लाखांचा दंड ठोठावत हे पैसे चार आठवडय़ांत याचिकाकर्त्या कंपनीला देण्याचे आदेश दिले.