नवी मुंबईत नववर्षाच्या पहाटे पोलीस हवालदार विजय चव्हाण (42) यांची दोन मारेकऱ्यांनी गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चव्हाण यांचा मृत्यू लोकल अपघातात झाला हे भासवण्यासाठी मारेकऱ्यांनी त्यांचा मृतदेह ट्रान्स हार्बर मार्गावरील रबाळे आणि घणसोली रेल्वे स्थानकांच्या दरम्यान लोकलसमोर रेल्वे रुळावर फेकला. मात्र मोटरमनच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा बनाव फसला.
पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले विजय चव्हाण हे घणसोली येथे राहत होते. मंगळवारी 31 डिसेंबर रोजी चव्हाण यांची साप्ताहिक सुट्टी होती. त्याच रात्री मारेकऱ्यांनी त्यांची गळा आवळून हत्या केली. चव्हाण यांचा अपघातात मृत्यू झाला हे भासवण्यासाठी दोन्ही मारेकरी बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह रबाळे रेल्वे स्थानक परिसरात घेऊन आले.
ठाणे-पनवेल ही लोकल रबाळे रेल्वे स्थानकातून पुढे घणसोलीच्या दिशेने निघाल्यानंतर मारेकऱ्यांनी चव्हाण यांचा मृतदेह रेल्वे रुळावर फेकून पलायन केले. लोकल अत्यंत जवळ आल्यानंतर मारेकऱ्यांनी केलेले हे कृत्य मोटरमनच्या निदर्शनास आले. मोटरमनने या घटनेची माहिती आरपीएफ जवान आणि वाशी रेल्वे पोलिसांना दिली.