डिजिटल अटक आणि कुरिअरच्या नावाखाली ठगाने दोन महिला आणि निवृत्त प्राध्यापकाची फसवणूक केली. या प्रकरणी उत्तर सायबर पोलिसांनी तीन गुन्हे नोंद केले आहेत.
गोरेगाव येथे राहणाऱ्या तक्रारदार या सेवानिवृत्त आहेत. गेल्या नोव्हेंबरमध्ये ठगाने त्यांना फोन करून त्याने तो आरबीआयआयच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे भासवले. तुमच्याविरोधात हैदराबाद येथे गुन्हा नोंद असल्याचे सांगून भीती दाखवली. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करा असे सांगितले. ठगाने त्यांना व्हिडीओ कॉल केला. सीबीआयचे सिक्रेट इन्वेस्टिगेशन असल्याचे भासवून त्याना भीती दाखवली. डिजिटल अटकेच्या नावाखाली महिलेकडून 1 कोटी 18 लाख रुपये उकळले.
तर दुसरी घटना वृद्ध महिलेसोबत घडली. ठगाने तिला पोलीस असल्याचे भासवले. चौकशीसाठी बंगळुरू येथे यावे लागेल असे सांगून भीती दाखवली. तुमच्या बँक खात्यात जे पैसे जमा झाले त्यातून मनी लॉण्डरिंग झाले आहे. तुमच्याविरोधात अटक वॉरंट काढले आहे. सीबीआय अधिकारी खूप स्ट्रिक्ट आहेत. त्यामुळे खरी माहिती सांगावी अशी भीती दाखवली. डिजिटल अटकेच्या नावाखाली त्याने 25 लाख रुपये उकळले. तिसरी घटना निवृत्त प्राध्यापकासोबत घडली. फोन करणाऱ्याने त्याना त्याचे पार्सल दिल्ली विमानतळावर आल्याचे सांगितले. त्या पार्सलविरोधात तक्रार दाखल आहे. कारवाईच्या नावाखाली त्याच्याकडून 1 कोटी 64 लाख रुपये उकळले.