सामना अग्रलेख – सावधान! सावधान!! कोरोनाहून भयंकर संकट

चीनमध्ये सध्या हाहाकार उडविलेल्या एचएमपीव्ही विषाणूचे संकट कोरोनासारखेच किंवा त्याहून भयंकर असेल तर जागतिक समुदायाने वेळीच या नवीन विषाणूची माहिती चीनकडून घ्यायला हवी. चीनमध्ये मोठ्या संख्येने लोक या विषाणूमुळे मृत्युमुखी पडत आहेत, स्मशानभूमीत जागाही कमी पडत आहे व त्यामुळे चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली असेल तर परिस्थिती गंभीर आहे. भारतासह जगभरातील साऱ्याच देशांनी या संहारक संकटाला रोखण्यासाठी खडबडून जागे व्हायला हवे! 

कोरोनासारखेच पण नाव बदलून आलेले जीवघेण्या विषाणूचे आणखी एक भयंकर संकट जगावर घोंगावू लागले आहे. कोविड-19 प्रमाणेच किंवा त्याहूनही अधिक संहारक असलेल्या एचएमपीव्ही या प्राणघातक विषाणूने चीनमध्ये थैमान घातले आहे. लोक किड्या-मुंग्यांप्रमाणे मरत आहेत व कोविडप्रमाणेच आताही चीनची लपवाछपवी सुरू आहे. चीनमध्ये विदेशी प्रसारमाध्यमांवर निर्बंध आहेत आणि चीनची सरकारी वृत्तसंस्था देईल तेव्हढीच तेथील खबरबात जगासमोर येते. मात्र गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून जी माहिती समोर येत आहे, त्यानुसार कोविड-19 प्रमाणेच घातक असलेल्या एचएमपीव्ही या नव्या व्हायरसचा चीनमध्ये मोठाच उद्रेक झाला आहे. या विषाणूच्या हल्ल्याने चीनमधील आरोग्य व्यवस्था सपशेल कोलमडली आहे. एचएमपीव्ही या विषाणूच्या संसर्गामुळे चीनमध्ये नेमके किती रुग्ण मृत्युमुखी पडले, याचा कुठलाच आकडा चीन सरकार बाहेर पडू देत नसले तरी खच्चून भरलेली रुग्णालये व स्मशानभूमींमधील न हटणारी गर्दी पाहता हे संकटही कोरोनासारखेच किंवा त्याहून भयंकर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोरोनाच्या वेळी ज्याप्रमाणे अंत्यसंस्कारांसाठी स्मशानभूमीत जागा मिळत नव्हती, तशीच परिस्थिती आज चीनमध्ये उद्भवली आहे. कोविड- 19 या विषाणूचे उगमस्थान चीनच्या वुहान शहरात होते व आताही एचएमपीव्ही हा विषाणू आधी चीनमध्येच पसरला आहे. बर्ड फ्लूपासून सार्स व कोविडपर्यंत सारेच

महासंहारक विषाणूजन्य आजार

चीनमधूनच कसे उगम पावतात, याचा छडा जगाला आजवर लागलेला नाही. जगभरात लाखो लोकांचे बळी घेणारा कोरोनाचा विषाणू हे मानवनिर्मित संकट होते काय व त्याचा बाप कोण होता, याचे उत्तर मिळाले नसतानाच आता एचएमपीव्ही या नव्या विषाणूच्या संसर्गानेही आधी चीनलाच आपल्या विळख्यात घेतले आहे. परिस्थिती इतकी गंभीर बनली आहे की, चीन सरकारने देशात अनेक ठिकाणी वैद्यकीय आणीबाणी जाहीर केली आहे. तूर्तास हा प्राणघातक व्हायरस चीनमध्येच सक्रिय असला तरी त्याची प्रचंड वेगाने होणारी संक्रमण क्षमता लक्षात घेता कोरोनाप्रमाणेच हा विषाणूदेखील चीनमधून जगभरात हातपाय पसरण्याचा धोका नाकारता येत नाही. एचएमपीव्ही अर्थात ‘ह्युमन मेटान्यूमोव्हायरस’ असे नाव असलेल्या या विषाणूच्या संसर्गाने चीनच्या अनेक प्रांतांमध्ये रुग्णसंख्या दिवसागणिक वाढते आहे. 2001 मध्ये डच संशोधकांना श्वसनाच्या आजारांनी ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये सर्वप्रथम हा विषाणू सापडला. त्याही आधीपासून हा विषाणू अस्तित्वात असला तरी आता मात्र तो भयंकर रूप धारण करून फुप्फुसे निकामी करत चीनमध्ये बळी घेत सुटला आहे. कोविडप्रमाणेच या विषाणूलाही धष्टपुष्ट करून प्राणघातक बनवण्याचे षड्यंत्र तर चीनच्या जैविक प्रयोगशाळांत रचले जात नव्हते ना, हे तपासायला हवे. सगळ्या विषाणूंचा जन्म चीनमध्येच होत असल्याने चीनविषयी एकंदरीत जगभरात संशयाचे वातावरण आहे. कोरोनाप्रमाणेच खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर, अशी लक्षणे

एचएमपीव्हीने बाधित

झालेल्या रुग्णांत दिसत आहेत. संसर्ग झालेल्या सर्व रुग्णांमध्ये आधी सर्दी होऊन ही सर्व लक्षणे दिसू लागतात. खास करून लहान मुले व वयोवृद्ध लोक यांच्यामध्ये या संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. रोगप्रतिकारक क्षमता कमी असलेल्या रुग्णांमध्ये या संसर्गाचे रूपांतर न्यूमोनियात होत असल्यामुळे मृत्यूचा धोका वाढतो आहे. खोकला व शिंकण्यामुळे एचएमपीव्हीचा हा व्हायरस वेगाने पसरत असल्याने या विषाणूने संक्रमित झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढते आहे. चीनमधील तमाम रुग्णालयांत एचएमपीव्हीने बाधित झालेल्या रुग्णांची गर्दी उसळली आहे. एचएमपीव्हीबरोबरच इन्फ्लुएन्झा व कोविडसारख्या विषाणूंनी बाधित रुग्ण सतत दाखल होत असल्याने चीन सरकारची झोप उडाली आहे. कोविडच्या संकटाने पाच वर्षांपूर्वी जगभरातील साऱ्याच देशांना आपल्या मगरमिठीत घेतले व लाखो लोक प्राणाला मुकले. जगभरातील वाहतूक, बाजारपेठा, व्यापार-उदीम सारे काही ठप्प झाले व चीन सोडून जगभरातील सर्व देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आल्या. चीनमध्ये सध्या हाहाकार उडविलेल्या एचएमपीव्ही विषाणूचे संकट कोरोनासारखेच किंवा त्याहून भयंकर असेल तर जागतिक समुदायाने वेळीच या नवीन विषाणूची माहिती चीनकडून घ्यायला हवी. चीनमध्ये मोठ्या संख्येने लोक या विषाणूमुळे मृत्युमुखी पडत आहेत, स्मशानभूमीत जागाही कमी पडत आहे व त्यामुळे चीनमध्ये वैद्यकीय आणीबाणी जाहीर करण्यात आली असेल तर परिस्थिती गंभीर आहे. भारतासह जगभरातील साऱ्याच देशांनी या संहारक संकटाला रोखण्यासाठी खडबडून जागे व्हायला हवे!