बॉर्डर-गावस्कर मालिकेतील अंतिम सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरू झाला. हिंदुस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटी गमावल्याने हिंदुस्थानचा संघ मालिकेत 1-2 असा पिछाडीवर आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनलच्या आशा कायम ठेवण्यासाठी या लढतीत हिंदुस्थानला विजय आवश्यक आहे. त्यामुळे अंतिम-11 खेळाडूंमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. रोहित शर्माला डच्चू देऊन जसप्रीत बुमराहकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. तसेच आकाशदीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला संघात स्थान देण्यात आले आहे.
सिडनी कसोटीच्या एक दिवस आधी ऑस्ट्रेलियाने आपला संघ जाहीर केला होता. मिशेल मार्शच्या जागी ऑस्ट्रेलियाने 31 वर्षीय अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला संघात स्थान दिले. तो पदार्पणाचा सामना खेळणार असून हिंदुस्थाननेही दोन बदल केले. रोहित शर्माला आराम देण्यात आला असून त्याच्या जागी शुभमन गिलने संघात कमबॅक केले आहे.
रोहित शर्मा गेल्या काही काळापासून फॉर्मात नाही. पर्थ कसोटीला वैयक्तिक कारणामुळे मुकल्यानंतर पुढील तीन कसोटीच्या 5 डावात मिळून त्याला फक्त 31 धावा काढता आल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईटवॉश मिळालेल्या मालिकेतही रोहितने 91 धावा केल्या होत्या. गेल्या 15 डावात त्याने 11 च्या सरासरीने 164 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एकाच अर्धशतकाचा समावेश आहे. त्यामुळे सिडनी कसोटीतून त्याला बाहेर ठेवण्यात आले.
🚨 Here’s #TeamIndia‘s Playing XI 🔽
UPDATES ▶️ https://t.co/cDVkwfEkKm#AUSvIND pic.twitter.com/BO2pofWZzx
— BCCI (@BCCI) January 2, 2025
नकोसा विक्रम
रोहित शर्माच्या नावावर एक नकोसा विक्रम जमा झाला आहे. द्विपक्षीय मालिका सुरू असताना अंतिम-11 खेळाडूंमधून डच्चू मिळणारा रोहित हिंदुस्थानचा पहिला कर्णधार ठरला आहे. याआधी एकाही कर्णधाराला मालिका सुरू असताना संघातून वगळण्यात आलेले नव्हते. रोहितआधी पाकिस्तानचा माजी कर्णधार मिसबाह-उल-हक, श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चांदीमल आणि इंग्लंडचा माजी कर्णधार माइक डेनेस यांना मालिका सुरू असताना संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता.
हिंदुस्थानचा संघ –
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, प्रसिद्ध कृष्णा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.