राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या नितेश राणे यांनी, ‘केरळ राज्य मिनी पाकिस्तान आहे, म्हणून तेथून राहुल गांधी व प्रियंका गांधी निवडून येतात’, असे बेताल वक्तव्य केले आहे. केरळ राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या नितीश राणे यांना बडतर्फ करून खटला दाखल करा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. सुभाष लांडे यांनी केली आहे.
केरळ राज्य हे देशातील राजकीयदृष्ट्या अतिशय सजग व प्रगत राज्य आहे. 100 टक्के साक्षर व डाव्या आघाडीचे सरकार सत्तेवर असलेल्या केरळ राज्याची कोरोना काळात जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. देशाला सर्वाधिक परकीय चलन मिळवून देणाऱ्या राज्याला ‘मिनी पाकिस्तान’ म्हणणे हा केरळच्या जनतेचा अपमान केला आहे. त्यामुळे राज्याचा मंत्री या संविधानिक पदावर असलेल्या राणे यांचा मुख्यमंत्र्यांनी तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी कॉ. लांडे यांनी केली आहे.
बेताल वक्तव्य करून दोन समाजात तेढ
धार्मिक तेढ वाढवून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठीच भाजपाने राणे कुटुंब नेमले आहे की काय, असा प्रश्न उपस्थित करून नीतेश राणे हे सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करून समाजामध्ये तेढ निर्माण करीत आहेत. आता देशाची बदनामी करणाऱ्या राणेंवर खटला दाखल करण्यात येऊन अटक करण्यात यावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.