पुणे शहरातील विविध भागांत भाईगिरीसह दादागिरी करीत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या सराईतांविरुद्ध एमपीडीएनुसार कारवाईचा बडगा उगारला आहे. संबंधितांना एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवघ्या 11 महिन्यांत एमपीडीए कारवाईची शंभरी पार केली आहे. त्यामुळे भाईगिरीसह दादागिरी करणाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, मागील काही वर्षांतील ही सर्वाधिक कमी कालावधीत झालेली कारवाई असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासह गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून विशेष प्राधान्य दिले आहे. प्रामुख्याने प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत अॅक्टिव्ह भाईगिरी आणि दादागिरी करणाऱ्यांची कुंडली एकत्रित केली जाते. त्यानुसार संबंधितांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्याप्रमाणे हद्दीत भाईगिरीसह दादागिरी करणाऱ्यांची संकलित माहिती देण्यात आली. 11 महिन्यांत 103 भाईंना एमपीडीए कारवाईचा तडाखा देण्यात आला. त्यामुळे कोयता गैंगसह रायझिंग गँगलाही आवर घालण्यास मदत झाली आहे. दरम्यान, मागील काही महिन्यांत पोलीस कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी कामाची पद्धत बदलल्याने गुन्हेगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
असा केला जातो एमपीडीए कारवाईचा पाठपुरावा
भाईगिरी-दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध झोपडपट्टी प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाईसाठी पीसीबी विभागाला वेळोवेळी रेकॉर्ड प्राप्त करावे लागते. संबंधित गुन्हेगाराची मागील पाच वर्षांतील गुन्ह्यांची माहिती एकत्रित करावी लागते. विशेषतः मोठ्या कागदपत्रांचा पाठपुरावा केल्यानंतर एमपीडीएनुसार कारवाईला गती दिली जाते. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हेगाराला राज्यातील कोणत्याही कारागृहात रवानगी करण्याचा अधिकार आहे. त्यानंतर 7 आठवड्यांच्या आतमध्ये आरोपीला अॅडव्हायजर बोर्डासमोर बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यामध्ये तो दोषी ठरल्यास पुन्हा कारागृहात रवानगी केली जाते.
कमी कालावधीत एमपीडीएची प्रभावी कारवाई
भाईगिरी-दादागिरी करणाऱ्यांविरुद्ध थेट एमपीडीए अस्त्राद्वारे स्थानबद्धतेचा दणका दिला जात आहे. पुणे पोलीस आयुक्तालयाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत 103 जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. पुण्यात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारांविरुद्ध करण्यात येत असलेली कारवाई प्रभावी ठरत आहे. अशा स्वरूपाची कारवाई झाल्यामुळे सराईत टोळ्यांसह गुन्हेगारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांच्या कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
“शहरातील नागरिकांची सुरक्षितता आमचे पहिले कर्तव्य असून, त्यादृष्टीने विविध कारवाया केल्या जातात. अशाच पद्धतीने भाईगिरी-दादागिरी करणाऱ्या 103 जणांविरुद्ध स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. कायदा-सुव्यस्था ठेवणे, महिला सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिक, मुला-मुलींसाठी आमचे पोलीस दल सदैव कार्यरत आहे.
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर