वाल्मीक कराडचे शेवटचे लोकेशन उज्जैनचे, महाकालचे घेतले होते दर्शन

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आरोप असलेला तसेच खंडणीच्या गुन्ह्यातही पोलिसांना हवा असलेला वाल्मीक कराड अद्याप फरार आहे. वाल्मीक कराडच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन 13 डिसेंबरला मध्य प्रदेशमधील उज्जैनचे असल्याचे समोर आले आहे. वाल्मीक कराडने स्वत: त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या देवदर्शनाचे फोटो शेअर केले आहेत. वाल्मीकने 11 डिसेंबरला महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतले. त्यानंतर दोन दिवसांनी त्याचा फोन बंद झाल्याचे समजते.

संतोष देशमुख यांना अडवून त्यांचे अपहरण करण्यात आले होते आणि ज्या गाडीमधून घेऊन गेले होते पुढे याच गाडीतून अज्ञात स्थळी नेऊन त्यांना मारहाण करण्यात आली होती आणि त्यांचा निर्घृण खून करण्यात आला होता. ही गाडी पोलिसांनी वाशीजवळ जप्त केली. याच गाडीमध्ये सीआयडी अधिकाऱयांना दोन मोबाईल सापडल्याची माहिती मिळत आहे. त्या मोबाईलमध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडीओ शूटिंग करण्यात आले होते. ते शूटिंग तिघांना पाठवण्यात आल्याचेही समोर आले आहे. तर या मोबाईलवरून एका बडय़ा नेत्याला तब्बल 16 वेळा कॉल करण्यात आल्याचीही चर्चा आहे.