मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात 36 तासांत 3 हत्या, ऑटोरिक्षात खून करून मृतदेह फेकला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरातच कायदा आणि सुव्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे निघाल्याचे समोर आले आहे. सलग दोन दिवसांत दोन कुख्यात गुंडांचा खून झाल्यानंतर उपराजधानीत खुनांच्या मालिकेने खळबळ उडाली आहे. कुंभारटोलीसमोर लोहारकर हॉटेलच्या बाजूला तिघांनी ऑटोरिक्षामधून मृतदेह बाहेर फेकला. तीन दिवसांतील हा तिसरा खून असल्याने नागपुरात चाललेय तरी काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरात बुधवारी आदिवासी प्रकाश नगर परिसरात वहिनीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून दिराने कुख्यात गुन्हेगार राहुल सचिन गुप्ता याच्या डोक्यात दांडय़ाने प्रहार करून त्याची हत्या केली. त्यानंतर दुसऱयाच दिवशी अजनी परिसरात कुख्यात गुन्हेगार रितेश शिक्कलवार याने मित्र कुलदीप चव्हाण याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे उघडकीस आले. शुक्रवारी तिघांनी मिळून एकाचा खून केल्याचे समोर आले. तिघांनी एकाला बळजबरीने ऑटोरिक्षात बसवले. त्यानंतर त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याची हत्या केली.