ज्येष्ठ दिग्दर्शिका सई परांजपे यांना यंदाचा ‘पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार सई परांजपे यांना भारतीय सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. सई परांजपे यांनी ‘स्पर्श’, ‘कथा’, ‘चश्मे बद्दूर’ आणि ‘दिशा’ सारख्या अनेक पुरस्कार विजेत्या सिनेमांचे दिग्दर्शन केले आहे. दिग्दर्शकासोबत त्या पटकथाकारही आहेत. हा पुरस्कार त्यांना अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे.

अजिंठा-एलोरा आंतरराष्ट्रीय 10 वा चित्रपट महोत्सव (AIFF 2025) यंदा 15 ते 19 जानेवारी दरम्यान छत्रपती संभाजीनगर येथए होणार आहे. या महोत्सवात वर्षाचा सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार पद्मपाणी जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण मान्यवरांच्या हस्ते महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात 15 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता एमजीएमच्या रुक्मिणी सभागृहात होणार आहे. तर महोत्सव पुढील पाच दिवस आयनॉक्स, प्रोझोन मॉल येथे होणार आहे.

हिंदुस्थानी सिनेमातील महत्वाच्या योगदानाबद्दल दिग्दर्शिका, पटकथाकार, निर्मात्या, लेखिका आणि नाटककार सई परांजपे यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. एआईएफएफच्या आयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, मुख्य संरक्षक अंकुशराव कदम आणि एआईएफएफ चे मानद अध्यक्ष आणि संचालक आशुतोष गोवारिकर यांनी सई परांजपे यांच्या नावाची घोषणा केली आहे. पद्मपाणी पुरस्कार निवड समितीमध्ये प्रसिद्ध चित्रपट समीक्षक लतिका पाडगावकर (अध्यक्ष), दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, सुनील सुकथनकर आणि चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश आहे. पद्मपाणी स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ सई परांजपे सिनेसृष्टीतील प्रमुख व्यक्ती आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या हिंदी सिनेमांनी भारतीय सिनेजगताला वेगळी ओळख प्राप्त करून दिली. अतिशय भावस्पर्शी, मानवी नातेसंबंधांवर भाष्य करणारे सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. त्यांच्या उल्लेखनीय कामामध्ये स्पर्श (1980), चष्मे बद्दूर (1981), कथा (1983), दिशा (1990), चुडियाँ (1993) आणि साझ (1997) या सिनेमांचा समावेश आहे.एवढेच नाही तर त्यांनी सिनेमांव्यतिरिक्त अनेक नाटक आणि बालनाट्याचे दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे मराठी साहित्यात, विशेषतः बालसाहित्यातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे.

2006 साली भारत सरकारने परांजपे यांना त्यांच्या या अतुलनीय योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने गौरविले आहे. नाथ ग्रुप, एमजीएम विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण सेंटर प्रस्तुत व मराठवाडा आर्ट कल्वर व फिल्म फाउंडेशनतर्फे आयोजित अजिंठा वेरुळ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल हा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्रालय भारत सरकार, सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने संपन्न होत आहे. या महोत्सवात अजिंठा-वेरुळ चित्रपट महोत्सवात होणार प्रदान मराठवाड्यातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, प्रमुख मार्गदर्शक अंकुशराव कदम, मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर, सतीश कागलीवाल, एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सवाचे संचालक सुनील सुकथनकर, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रिएटिव्ह डायरेक्टर जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटिंग, शिव कदम, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. रेखा शेळके, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे, प्रेरणा दळवी, सुबोध जाधव, अमित पाटील आदींनी केले आहे.