हिंदुस्थान आणि बांगलादेश या दोन देशांमधील संबंध म्हणावे तितके चांगले राहिले नाहीत. माजी पंतप्रधान शेख हसीना या पायउतार झाल्यानंतर या दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे, परंतु असे असले तरी या दोन देशांत व्यापार मात्र सुरूच आहे. बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हिंदुस्थानकडून एक लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेशात शुक्रवारी 27 हजार टन तांदळाची पहिली खेप बांगलादेशच्या चितगावमध्ये पोहोचली आहे. बांगलादेशात सध्या पुरेसा तांदूळ आहे, परंतु नुकत्याच आलेल्या भीषण पुरामुळे भविष्यातील संकट टाळण्यासाठी बांगलादेश सरकारने तांदूळ आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन लाख टन उकडलेल्या तांदळाशिवाय बांगलादेशचे अंतरिम सरकार हिंदुस्थानातून एक लाख टन तांदूळ निविदाद्वारे आयात करणार आहे. म्यानमारसोबत एक लाख टन तांदूळ आयात करण्यासाठी जीटूजी करार केल्याचेही बांगलादेशने म्हटले आहे. भाव स्थिर ठेवण्यासाठी बांगलादेशने तांदळाच्या आयातीवरील सर्व शुल्क हटवले आहेत.