पोक्सो गुह्यातील आरोपीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर, प्रेमसंबंधातून अत्याचार केल्याचा आरोप

अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केलेल्या आरोपीला उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. पीडित मुलगी आणि आरोपी हे दोघेही त्यांच्या कृतीचे परिणाम समजून घेण्याइतपत प्रौढ आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपीने उच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली होती. पोलिसांनी त्याच्यावर पोक्सो आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गतही गुन्हा दाखल केला. त्याच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती अनिल किलोर यांच्या एकलपीठाने निर्णय दिला. पीडित मुलगी आरोपीसोबत माधवनगर-सांगली येथे महिनाभर एकत्र राहिली होती. याचदरम्यान आरोपीने मुलीवर बलात्कार केल्याचे पोलीस तपास आणि आरोपपत्रातून न्यायालयाच्या निदर्शनास आले.

प्रथमदर्शनी दोघांचे प्रेमसंबंध असल्याचे दिसून येते. पीडित मुलगी आरोपीसोबत पळून गेली होती. ती स्वतःच्या कृतीचे परिणाम जाणून घेण्याइतपत पुरेशी परिपक्व होती. या प्रकरणात अर्जदार आरोपी मागील वर्षभर तुरुंगात आहे. तसेच खटला नजीकच्या काळात पूर्ण होण्याचीही शक्यता नाही, असे निरीक्षण नोंदवत न्यायमूर्ती किलोर यांनी आरोपीला जामिनावर तुरुंगातून सोडण्याचे आदेश दिले.