>> संजीव साबडे
वर्षाच्या या शेवटच्या दिवशी तुम्ही काय करणार आहात? नव्या वर्षासाठी कोणता पण करणार आहात? जे काय ठरवलं आहे ते कराच, पण बाहेर जेवायला जाणार असाल तर नेहमीपेक्षा अगदी वेगळी ठिकाणं सुचवण्याचा हा प्रयत्न.
आजचा रविवार हा डिसेंबरचा आणि या वर्षाचाही शेवटचा रविवार. पाच दिवसांपूर्वी काहींनी ख्रिसमस म्हणजे नाताळ साजरा केला. नाताळ दिवाळीसारखाच. तो आता विशिष्ट धर्मापुरता राहिला नाही. गेले दहा दिवस जवळपास सर्व ठिकाणी आकाशतारे, ख्रिस्मस ट्री, बाळ येशूच्या जन्मकथेची मांडणी, सांताक्लाज असं सण-उत्सवाचं वातावरण आहे. काहींच्या घरी केक आणतात, काहींच्या घरी शेजारी वा मित्र आणून देतात, काहींना जेवायला बोलावलं जातं वा घरी खास पदार्थ पाठवले जातात. अर्थात मिश्र वस्ती असलेल्या ठिकाणी हे घडतं. पण उत्सव मात्र दुकानात, मॉलमध्ये आणि रस्त्यांवर जाणवतो. नाताळनंतर वेध लागतात नव्या वर्षाचे आणि त्याच्या स्वागतासाठी शेवटच्या दिवशी होणाऱया पाटर्य़ांचे.
पूर्वी नववर्षाच्या स्वागताच्या पार्टीचा उत्साह असायचा, कारण त्यानिमित्ताने घरातले सर्वजण एकत्र जेवायला जात. आता पार्टी म्हटली की ती बहुसंख्य वेळा ओली असते आणि तिथे आरडाओरडा, गोंधळ असतो. त्यामुळे काही जण घरात टीव्हीवरील विशेष कार्यक्रम बघत बसतात. काही वेळा बाहेरून जेवण मागवतात, पण तसं जेवण्यात गंमत नसते. रात्रीचे 12 वाजले की जल्लोष होतो, फटाके वाजतात, फोनाफोनी स्रू होते, मेसेजचा भडिमार स्रू होतो. त्यांना उत्तरं देताना दमून जातो. तरीही ते सारं हवंहवंसं वाटतं. तर वर्षाच्या या शेवटच्या दिवशी तुम्ही काय करणार आहात? नव्या वर्षासाठी कोणता पण करणार आहात? जे काय ठरवलं आहे ते कराच, पण बाहेर जेवायला जाणार असाल तर नेहमीपेक्षा अगदी वेगळी ठिकाणं सुचवण्याचा हा प्रयत्न.
गेल्या काही वर्षांत पॉप अप रेस्टॉरंटस् संकल्पना वाढली आहे. पॉप अप म्हणजे तात्पुरतं रेस्टॉरंट. विशिष्ट पद्धतीच्या म्हणजे उदाहरणार्थ मलेशियन, कायस्थ वगैरे जेवणाची तिथे सोय असते. काही शेफ हे खाद्यपदार्थ तयार करतात. एखाद्या हॉलमध्ये, एखाद्याच्या घरी, गार्डन वा इमारतीच्या आवारात किंवा अगदी काही तासांसाठी रेस्टॉरंटच्या जागेत हे केलं जातं. जोगेश्वरीला ‘डाईन विथ विजयकर्स’तर्फे पाठारे प्रभू ख्रिसमस पॉप अप मिल अलीकडेच झालं. पाचकळशी जेवण पॉप अप शिवाजी पार्कमधील एका हॉलमध्ये प्रख्यात शेफ नीलेश लिमये यांनी केला. शेफ अर्चना सराफ तुमच्या घरातील पार्टीसाठी सूप आणि डेझर्टस् वगैरे करतात. या वर्षीही 31 डिसेंबर रोजी अनेक ठिकाणी पॉप अप आहेत, पण ते जेवण आपल्यासारख्या सामान्यांना परवडणारं नाही. त्याऐवजी जानेवारीत होणाऱया विविध खाद्य महोत्सवांना जाणं उत्तम.
विविध देशांतील खाद्यपदार्थ मिळणारी रेस्टॉरंट्स मुंबई, ठाणे, पुणे व अन्य शहरांत आहेत. जमल्यास 31 ला तिथे जा किंवा अशा ठिकाणांची माहिती करून घ्या. तुर्की, थाई, श्रीलंकन, मेक्सिकन, जापनीज आणि अगदी ऑथेंटिक चायनीज जेवण व खाद्यपदार्थ देणारी ठिकाणंसुद्धा माहीत असायला हवीत. वर्षाची अखेर आणि नव्या वर्षाची सुरुवात तिथे करायला काय हरकत आहे? त्या रेस्टॉरंट्सची नावं पाहू. पण तेथील खाद्यपदार्थांच्या नावातून काही कळत नाही. त्यामुळे खाद्यपदार्थ ऑर्डर करण्याआधी मेन्यूमधील माहितीवर अवलंबून न राहता तिथल्या
कॅप्टनला बोलावून नीट विचारून घ्या. थाई, चायनीज, श्रीलंकन, जपानी खाद्यपदार्थांत माशांचा अधिक वापर असतो, पण तेच पदार्थ माशाशिवायही मिळतात. सुशी या जपानी प्रकारात मासा असतो, पण तुम्ही मासे खात नसाल तर शाकाहारी हवं हे सांगा. मासे खाणाऱयांनीही नेमका कोणता मासा आहे, हे विचारावं. रामेन हा जपानी व कोरियन पदार्थ नूडल्सच्या घराण्यातला. तो मांसाहारी व शाकाहारीही असतो. थाई भात व व्हेज वा नॉन व्हेज करी मस्त. चायनीज, थाई, श्रीलंकन यात थोडं साम्य आहे. श्रीलंकेचं जेवण दक्षिण भारताच्या जवळ जाणारं, पण तिखट. चायनीज पदार्थ खूपच ओळखीचे झाले आहेत. इतके की मध्यंतरी छत्रपती संभाजीनगरला राजस्थानी थाळीत फरसाण म्हणून नूडल्स होते. हल्ली आपल्याही समारंभात चायनीज पदार्थ असतात. तरीही ऑथेँटिक चायनीज पदार्थ नेमके कसे असतात, हे समजून घेणं गरजेचं.
टर्की जेवणही बरंच सोपं आहे. त्यात रोटी आहे, कबाब आहे. केळीच्या वा अन्य पानात शिजवलेला भात आहे. हमस हा पदार्थ तर शाकाहारी आणि मस्तच. त्यांच्यात भाजी व करीचे प्रकार बरेच सारखे आहेत. टर्की आइक्रीम व बकलावा मस्तच. मुंबई व ठाण्यात मेक्सिकन रेस्टॉरंट ठिकठिकाणी दिसतात. न्यूयॉर्क बरिटो कंपनीमध्ये अनेक मांसाहारी व शाकाहारी पदार्थ मिळतात. तेथील ताको, नाचो, अवाकडो सॉस, काळा राजमा व भात आवडेल असा आहे. श्रीलंकेचं जेवण तंगबली (माहीम), होपाम (बांद्रा), फिशरमन किचन (गोरेगाव), मिरची अँड माईम (पवई), मल्हार ट्राईब्ज (मरोळ), सासीस्पून (नरीमन पॉइंट), बॅस्टीयन (लिंक रोड, बांद्रा) व कळव्यात केकेपीमध्ये मिळतं. थाई खाद्यपदार्थांसाठी ठाण्यात थाईची (पाटलीपाडा), प्या थाई (हिरानंदानी मिडो), डिझायर चायनीज अँड थाई (मानपाडा) इथे जाता येईल. मुंबईत नारा थाई (बीकेसी), तन्नक थाई (सावरकर मार्ग, दादर), ब्लू किचन व द वर्क हाऊस (दोन्ही खार) आणि हाओची (सन अँड सॅन्ड हॉटेल) इथे थाई पदार्थ छान मिळतात. जपानी जेवणासाठी शेफ जेम्स जापनीज (आदर्श नगर, अंधेरी) इझुमी (खार), ताकी ताकी (वरळी), टोकियो ट्रीट (सेनापती बापट मार्ग, परळ), सुशी डिलाईट (खार), सुशिमी, घोडबंदर (ठाणे), हाना (पाच पाखाडी) तसंच नोरी, (चितळसर, टिकूजी नी वाडी रोड) इथे जा.
तुर्की जेवणाचा आस्वाद घायचा असेल तर पोर्टींको बिस्ट्रो (हिरानंदानी ठाणे) टर्कीश शॉरमा (मुंब्रा), दमसक शीशा (मीरा रोड), मिनिया तुर्क (अंधेरी), टर्की जंक्शन (वांद्रे), बेरूट (जुहू) टर्कीश डिलाईट (ओशिवरा), टर्की सेंट्रल (जुहू तारा रोड), फाहम (काळा घोडा फोर्ट) आणि इलीली (रामी गेस्टलाईन, दादर पूर्व) ही ठिकाणं चांगली. अनेकांचा आवडता
शॉरमा तिथे नक्की मिळतो. पाहा यंदा जमतंय का? नाही तर नव्या वर्षात जा.